गुंगी गुडिया, आयर्न लेडी, दूर्गा, लेडी डिक्टेटर

Share this Video

भारतीय राजकारणात सर्वात आधी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हणण्यात आलं. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांना संसदेत अनेक वेळा गुंगी गुडिया म्हटलं होतं. पण हा विषय आज पुन्हा चर्चेला आलाय. कारण महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलंय, यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेत, थेट काँग्रेस कार्यालयात जावून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा, सुनेत्रा अजित पवार यांना सांभाळावी लागली, अश्रू पुसत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. सुनेत्रा पवार काहीच बोलत नाहीत किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत, म्हणून त्यांना सपकाळ यांनी गुंगी गुडिया म्हटलं असावं.पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या पक्षाच्याच एकेकाळच्या दिवंगत नेत्या, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हणत टोमणे मारले जात होते, पण हीच गुंगी गुडिया नंतर आयर्न लेडी ठरली. याचं आणखी एक उदाहरण, देशात एकेकाळी डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. सोव्हिएत संघाच्या पाठिंब्याने इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी इंदिरा गांधी यांची लोकप्रियता एवढी वाढली की, अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यांना "दुर्गा" अशी उपमा दिली.पण दुसऱ्या बाजूला असंही म्हणतात की, इंदिरा गांधींना दुर्गेचा अवतार असं वायजपेयींनी कधीच म्हटलं नव्हतं. तो एक सर्वसाधारण समज पसरला असं म्हणतात, ज्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केलं, त्यादिवशी वाजपेयींनी इंदिरा गांधींना दुर्गेचा अवतार म्हटलं होतं, पण त्या दिवशी अटलबिहारी वाजपेयी संसदेत उपस्थित नसल्याचं सांगण्यात येतं.प्रिव्ही पर्स रद्द करण्याचं इंदिरा गांधी यांचं विधेयक संसदेत मंजूर झालं नाही, तेव्हा त्यांनी अध्यादेश काढला, पण हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला, तर त्यांनी लोकसभाच विसर्जित केली. या 'लेडी डिक्टेटर' ला शक्य असतं तर त्यांनी सर्वोच्च न्यायालय सुद्धा विसर्जित केलं असतं, असं त्यावेळी बोलताना वाजपेयी यांनी त्यांचा उच्चार लेडी डिक्टेटर असा केला.इंदिरा गांधी यांना राजकारणात कधी गुंगी गुडिया, कधी आयर्न लेडी, तर कधी दूर्गा, तर कधी लेडी डिक्टेटर म्हटलं गेलं. देशाच्या राजकारणात महिला दिवसेंदिवस कणखर होण्याचं हे चित्रंय.

Related Video