अभिनेत्री रेशम टिपणीस हिने तिच्या मुलाने आत्महत्या केल्याच्या अफवांवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

मुंबई : मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस हिने तिच्या मुलाबाबत सोशल मीडियावर पसरवलेल्या खोट्या बातम्यांवर संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडे एका गुजराती अभिनेत्रीच्या मुलाच्या आत्महत्येच्या बातमीत रेशम टिपणीस आणि तिचा मुलगा मानव यांचा फोटो वापरण्यात आल्यामुळे अफवांना उधाण आलं. या प्रकरणावर रेशमनं स्पष्ट भूमिका घेत, “माझा मुलगा ठणठणीत आहे,” असं म्हटलं आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही दिला.

खोटी बातमी, चुकीचा फोटो आणि अफवांचा फैलाव

कांदिवलीतील आत्महत्येच्या घटनेची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, एका वेब पोर्टलने या बातमीसाठी रेशम टिपणीस व तिच्या मुलाचा फोटो वापरला. यामुळे अनेकांनी समजून घेतलं की आत्महत्या करणारा मुलगा मानव टिपणीस आहे. सोशल मीडियावर ही चुकीची माहिती प्रचंड व्हायरल झाली, ज्यामुळे अभिनेत्रीवर आणि तिच्या कुटुंबावर मानसिक ताण आला.

रेशम टिपणीसची फेसबुक/इंस्टाग्राम पोस्ट

रेशमनं तात्काळ सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी फेक असल्याचं स्पष्ट केलं. ती म्हणाली “कृपया खोटी बातमी पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. बाप्पाच्या कृपेनं माझा मुलगा मानव ठणठणीत आणि सुरक्षित आहे. पण ज्यांनी ही अफवा पसरवली, त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.”

व्हिडीओद्वारे संतप्त प्रतिक्रिया

रेशमनं एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली “हा व्हिडीओ पोस्ट करायचा नव्हता, पण फोनचा इतका मारा झाला की मला तो करावाच लागला. 'Laughing Colours' नावाच्या अकाउंटवर माझ्या मुलाबाबत खोटी बातमी टाकण्यात आली. 57व्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली, असं लिहिलं. पण मी अर्धा तास आधीच त्याच्याशी बोलले होते. हे विनोद नाहीत, हे कुणाच्या भावना आहेत याचा विचार करा.”

सायबर क्राईममध्ये तक्रारीचा विचार

रेशमनं स्पष्ट केलं की ती सायबर क्राईममध्ये याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. ती म्हणाली “ही गंभीर बाब आहे. फेक बातम्या पसरवणाऱ्यांना थांबवणं गरजेचं आहे. अशा गोष्टींमुळे सोशल मीडियावरील विश्वास हरवत चालला आहे.”

वैयक्तिक आयुष्य आणि मुलगा मानव

रेशम टिपणीस आणि तिचा माजी पती संजीव सेठ यांना मानव आणि राधिका ही दोन मुलं आहेत. 2004 मध्ये त्यांच्या घटस्फोटानंतरही रेशमनं संजीवचं दुसरं लग्न स्वतः करून दिलं. मानवी दृष्टिकोनातून रेशम टिपणीसने केलेली ही कृती समाजात आदर्शवत मानली गेली होती. सध्या मानव अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे आणि ठणठणीत असून आपल्या कामात व्यग्र आहे.