- Home
- Utility News
- Bluetooth Speaker : सणासुदीच्या ऑफरमध्ये ब्लूटूथ स्पीकर घेताय? मग या ७ गोष्टी नक्की तपासा
Bluetooth Speaker : सणासुदीच्या ऑफरमध्ये ब्लूटूथ स्पीकर घेताय? मग या ७ गोष्टी नक्की तपासा
चांगला ब्लूटूथ स्पीकर घ्यायचा असेल तर फक्त वॅट्स (Watts) बघून चालणार नाही. बॅटरी बॅकअप, डस्ट आणि वॉटर प्रूफसाठी आयपी (IP) रेटिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ऑडिओ कोडेक सपोर्ट यांसारख्या गोष्टीही नक्की तपासा.

बेस्ट ब्लूटूथ स्पीकर कसा निवडायचा?
घर, ऑफिस, ट्रॅव्हलिंग किंवा छोटी पार्टी असो, आजकाल ब्लूटूथ स्पीकरचा वापर खूप वाढलाय. वायरची कटकट नसल्याने आणि मोबाईलला सहज कनेक्ट होत असल्याने याला मोठी मागणी आहे. सणासुदीच्या काळात ऑफर्स असतात, त्यामुळे अनेकजण स्पीकर खरेदी करतात.
पण मार्केटमध्ये ५०० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतचे ब्लूटूथ स्पीकर्स मिळतात. यातला कोणता घ्यायचा? जास्त पैसे मोजले तरच चांगला स्पीकर मिळतो का? वॅट्स (Watts) जास्त असतील तर आवाज चांगला येतो का? असे अनेक प्रश्न पडतात. स्पीकर घेताना या ७ गोष्टी तुम्ही नीट तपासल्या, तर तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला एक बेस्ट स्पीकर मिळेल.

फक्त वॅट (Watt) बघून चालणार नाही
१. फक्त वॅट्स (Watts) बघून स्पीकर घेऊ नका
ब्लूटूथ स्पीकर घेताना बहुतेकांचं लक्ष फक्त वॅट्सवर (W) असतं. उदाहरणार्थ, 10W स्पीकरपेक्षा 20W स्पीकर जास्त आवाज देतो. पण वॅट्स जास्त म्हणजे साउंड क्वालिटी भारीच असेल असं नाही. स्पीकरचा ड्रायव्हर, ट्युनिंग, कॅबिनेट डिझाईन आणि डिस्टॉर्शन यावरून त्याची साउंड क्वालिटी ठरते. त्यामुळे 40W चा स्पीकर 20W पेक्षा दुप्पट चांगला असेलच असं समजू नका. घरात गाणी ऐकण्यासाठी 10W-20W चा स्पीकर पुरेसा असतो. मोठी खोली किंवा बाहेर वापरायचा असेल तर जास्त आउटपुट लागतं.
२. बॅटरी बॅकअप नक्की तपासा
स्पीकर घेतल्यावर सारखं चार्जिंग करावं लागलं तर वैताग येतो. म्हणूनच कंपनीने दिलेला बॅटरी प्लेबॅक टाईम तपासा. कमी वापरासाठी ५-६ तास, रोजच्या वापरासाठी ८-१२ तास आणि ट्रॅव्हल किंवा आउटडोअरसाठी १५-२०+ तासांचा बॅकअप देणारे स्पीकर्स बेस्ट असतात. पण लक्षात ठेवा, कंपनीने सांगितलेली बॅटरी लाईफ ठराविक टेस्टिंग कंडिशनमध्येच मिळते. फुल व्हॉल्यूमवर सलग गाणी ऐकली तर बॅटरी लवकर संपते. त्यामुळे स्पीकर किती वेळात चार्ज होतो आणि किती वेळ चालतो, हे नक्की बघा.
ब्लूटूथ व्हर्जन विरुद्ध ऑडिओ क्वालिटी
३. वॉटरप्रूफ की वॉटर रेझिस्टंट?
वॉटरप्रूफ स्पीकरची जाहिरात दिसली की तो थेट पाण्यात टाकता येतो असं समजू नका. स्पीकरला आयपी (IP) रेटिंग आहे की नाही ते तपासा. उदाहरणार्थ, IP67 असेल तर पहिला नंबर 6 डस्ट प्रोटेक्शन आणि दुसरा नंबर 7 पाण्यात बुडाल्यावरही टिकून राहण्याची क्षमता दाखवतो. तसेच IPX4, IPX5, IPX6 सारखे रेटिंग्स वेगवेगळ्या पातळीवर वॉटर प्रोटेक्शन देतात. बाथरूम, स्विमिंग पूलजवळ किंवा पावसाळ्यात बाहेर वापरायचा असेल तर आयपी रेटिंग बघणं खूप महत्त्वाचं आहे. पण आयपी रेटिंग आहे म्हणून मुद्दाम स्पीकर पाण्यात टाकणं सुरक्षित नाही.
४. ब्लूटूथ व्हर्जन बघून फसू नका
ब्लूटूथ 5.0, 5.2, 5.3, 5.4 असे नवीन व्हर्जन्स येत आहेत. पण लेटेस्ट व्हर्जन म्हणजे ऑडिओ क्वालिटी एकदम भारी असेल असं नाही. ब्लूटूथ व्हर्जनचा परिणाम फक्त कनेक्टिव्हिटी, पॉवर एफिशियन्सी आणि काही तांत्रिक फीचर्सवर होतो. साउंड क्वालिटी फक्त ब्लूटूथ व्हर्जनवर ठरत नाही. स्पीकर कोणते ब्लूटूथ कोडेक्स सपोर्ट करतो, तुमचा फोन कोणते कोडेक्स सपोर्ट करतो, स्पीकरचं हार्डवेअर आणि ट्युनिंग कसं आहे, हेही महत्त्वाचं असतं. त्यामुळे फक्त ब्लूटूथ 5.x बघून स्पीकर खरेदी करू नका.
बास (Bass) चांगला म्हणजे सगळं चांगलं का?
५. फक्त बास म्हणजे चांगला आवाज नाही
दुकानात स्पीकर टेस्ट करताना अनेकजण आधी बास (Bass) चेक करतात. बास भारी असेल तर स्पीकर चांगला असं ते ठरवून टाकतात. पण खऱ्या साउंड क्वालिटीसाठी फक्त बास पुरेसा नसतो. व्होकल्स क्लिअर आहेत का? म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे ऐकू येतात का? व्हॉल्यूम वाढवल्यावर आवाज फाटतो का? या सगळ्या गोष्टी बघायला हव्यात. बास जास्त असेल आणि गाण्यातला आवाज क्लिअर नसेल तर तो स्पीकर तुम्हाला आवडणार नाही. म्युझिक, मूव्हीज, यूट्यूब, पॉडकास्ट्स अशा सगळ्यासाठी वापरायचा असेल तर बॅलन्स्ड साउंड देणारा स्पीकर निवडणं कधीही चांगलं.
६. USB-C, AUX सारखे फीचर्स आहेत का?
स्पीकर घेताना फक्त वायरलेस कनेक्टिव्हिटीच नाही, तर पोर्ट्स आणि इतर फीचर्सकडेही लक्ष द्या. विशेषतः USB-C चार्जिंग, AUX इनपुट, USB ऑडिओ/प्लेबॅक, मायक्रो SD कार्ड स्लॉट, मायक्रोफोन/हँड्स-फ्री कॉलिंग, स्टिरिओ पेअरिंग आणि मल्टी-स्पीकर कनेक्शन असे फीचर्स काही मॉडेल्समध्ये मिळतात. उदाहरणार्थ, ब्लूटूथ कनेक्ट होत नसेल तर AUX इनपुट खूप कामी येतं. तसेच USB-C चार्जिंग असेल तर सध्याच्या डिव्हाइसेससोबत तो सहज चार्ज करता येतो.
७. फक्त किंमत नाही, वॉरंटीही बघा
७०० रुपयांच्या आणि ७,००० रुपयांच्या स्पीकरमध्ये खूप फरक असतो. पण जास्त पैसे मोजले म्हणजे तो तुमच्या गरजेसाठी बेस्ट असेलच असं नाही. आधी तुम्हाला स्पीकर कशासाठी हवाय ते ठरवा. पर्सनल युजसाठी छोटा आणि स्वस्त स्पीकर पुरेसा असतो. हॉलसाठी बेस्ट साउंड क्वालिटी आणि पुरेसा व्हॉल्यूम महत्त्वाचा असतो. ट्रॅव्हलिंगसाठी बॅटरी, ड्युरेबिलिटी आणि वॉटर रेझिस्टन्स गरजेचा असतो. पार्टीसाठी जास्त साउंड आउटपुट, बॅटरी आणि बास लागतो. त्यानंतर वॉरंटी, सर्व्हिस सेंटर आणि रिप्लेसमेंट पॉलिसी या गोष्टीही नक्की तपासा.
ब्लूटूथ स्पीकर घेताना फक्त वॅट्स (Watts) बघून निर्णय घेणं ही मोठी चूक आहे. साउंड क्वालिटी, बॅटरी, आयपी रेटिंग, कनेक्टिव्हिटी, फीचर्स, तुमची गरज आणि वॉरंटी.. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच स्पीकर निवडा. तुम्ही कमी बजेटमध्ये स्पीकर घेत असाल किंवा ५,००० ते १०,००० रुपये खर्च करत असाल, या बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या गरजेनुसार एक बेस्ट स्पीकर तुम्हाला नक्की मिळेल.

