वनप्लस एस ७ (OnePlus Ace 7) सिरीज लवकरच बाजारात धडकणार आहे. भारतात हा फोन वनप्लस १६आर (OnePlus 16R) या नावाने लाँच होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ चिपसेट, २०० मेगापिक्सेल कॅमेरा आणि तब्बल ९००० एमएएचची तगडी बॅटरी मिळू शकते.

वनप्लस एस ७ (OnePlus Ace 7) सिरीज याच वर्षी बाजारात येऊ शकते. जुन्या एस ६ सिरीजच्या तुलनेत या नव्या फोनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील अशी चर्चा आहे. कंपनीने अजून अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही, पण या फोनचे फीचर्स आणि किंमतीबद्दल बरीच माहिती लीक झाली आहे. या नव्या सिरीजमध्ये एस ७ आणि एस ७ प्रो असे दोन मॉडेल्स असू शकतात. हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि मोठी बॅटरी हे या फोनचे मुख्य आकर्षण असणार आहे.

भारतात वनप्लस १६आर नावाने येणार?

टिपस्टर देबयान रॉय यांनी एक्स (X) प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, भारतात एस ७ सिरीज वनप्लस १६आर (OnePlus 16R) या नावाने लाँच होऊ शकते. याची किंमत ७०,००० ते ७५,००० रुपयांच्या घरात असू शकते. याआधी वनप्लस १५आर भारतात ५९,९९९ रुपयांना लाँच झाला होता. त्यामुळे नव्या मॉडेलची किंमत थोडी जास्त असेल असा अंदाज आहे.

दमदार प्रोसेसर

एस ७ सिरीजमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ (Snapdragon 8 Elite Gen 5) चिपसेट दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, यात SM8850 आणि SM8850Q मॉडेल नंबरचे चिपसेट वापरले जातील. या फोनमध्ये ६.७८ इंचाचा फ्लॅट LTPS OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तसेच, हा डिस्प्ले १.५के (1.5K) रिझोल्यूशन आणि १८५ हर्ट्झ (185Hz) रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

२०० मेगापिक्सेल कॅमेरा

या फोनमध्ये कॅमेऱ्याच्या बाबतीतही मोठा धमाका पाहायला मिळेल. एस ७ सिरीजमध्ये २०० मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पुढे १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. दुसरीकडे, एस ७ प्रो मॉडेलमध्ये ५० मेगापिक्सेलचा सॅमसंग जेएन५ (Samsung JN5) पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात ३.५ पट (3.5x) ऑप्टिकल झूमचा सपोर्टही असेल.

९००० एमएएच बॅटरी

बॅटरीच्या बाबतीत वनप्लस मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. एस ७ सिरीजमध्ये तब्बल ९००० एमएएच (9000mAh) क्षमतेची मोठी बॅटरी मिळू शकते. यासोबतच १०० वॅट (100W) किंवा त्याहून अधिक क्षमतेचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. फोन सलग चांगला चालावा आणि गरम होऊ नये म्हणून यात इन-बिल्ट कूलिंग फॅनही असू शकतो.

अजून अधिकृत घोषणा नाही

वनप्लसने याआधी त्यांच्या एस सिरीजचे काही फोन भारतात 'आर' (R) सिरीज म्हणून लाँच केले आहेत. त्यामुळे एस ७ सिरीजमधील एखादं मॉडेल भारतात वनप्लस १६आर नावाने येण्याची दाट शक्यता आहे. पण या सिरीजचं काम कुठपर्यंत आलंय किंवा भारतात हा फोन कधी येईल, याबाबत वनप्लसने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या घोषणेपर्यंत लीक झालेल्या या माहितीला अंतिम मानणं घाईचं ठरेल.

एस ६ सिरीजवर एक नजर

वनप्लस एस ६ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाजारात आला होता. स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट आणि ७८०० एमएएच बॅटरी हे त्या फोनचं मुख्य आकर्षण होतं. त्यानंतर या वर्षी एप्रिलमध्ये वनप्लस एस ६ अल्ट्रा लाँच झाला. त्यात मीडियाटेक डायमेन्सिटी ९५०० (MediaTek Dimensity 9500) चिपसेट आणि ८६०० एमएएच बॅटरी देण्यात आली होती. आताच्या रिपोर्ट्सनुसार, नव्या एस ७ सिरीजमध्ये याहूनही मोठी बॅटरी आणि अधिक पॉवरफुल हार्डवेअर पाहायला मिळेल.