पुढील २ महिन्यांत मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. याला कारण म्हणजे, या उपकरणांमध्ये मेंदूप्रमाणे काम करणाऱ्या चिपचा तुटवडा. 

नवी दिल्ली: पुढील २ महिन्यांत मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. याला कारण म्हणजे, या उपकरणांमध्ये मेंदूप्रमाणे काम करणाऱ्या चिपचा तुटवडा. या साधनांमध्ये माहिती साठवण्यासाठी आणि कार्यप्रणालीसाठी आवश्यक असलेल्या चिपला आता AI क्षेत्रात मोठी मागणी निर्माण झाली आहे, आणि त्याचा पुरवठाही तिकडे वळला आहे.

परिणामी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची उपलब्धता कमी झाली असून, किमतीत वाढ झाली आहे. AI च्या विकासात चिप अत्यंत आवश्यक आहे. हे क्षेत्र वेगाने वाढत असल्यामुळे चिपची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त वाढत आहे.

मोबाईलसारख्या उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिपपेक्षा AI कंपन्या वापरत असलेल्या चिप्सची किंमत जास्त असते. त्यामुळे साहजिकच जास्त नफ्यासाठी चिप उत्पादक कंपन्या AI कंपन्यांवर अवलंबून राहू लागल्या आहेत. दुसरीकडे, बाजारात चिपच्या तुटवड्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ होणार आहे, जे उपकरणांच्या किमतीतही दिसून येईल. विजेवर चालणाऱ्या वाहनांसह सर्व वाहनांमध्ये चिप वापरली जाते. पण त्या जुन्या प्रकारच्या चिप्स असून त्यांचे उत्पादन जवळपास थांबले आहे. परिणामी वाहनांच्या किमतीही वाढणार आहेत.

सध्यातरी परिस्थितीत सुधारणा नाही:

ही परिस्थिती लवकर सुधारणे कठीण आहे. कारण, चिप उत्पादन कंपन्यांच्या स्थापनेसाठी किमान ३-५ वर्षे लागतात. त्यामुळे, २०२८ पर्यंत नवीन उत्पादक बाजारात येणार नाहीत आणि चिपचा तुटवडा कायम राहील.

जल्लिकट्टू स्पर्धेतील विजेत्यांना सरकारी नोकरी: स्टॅलिन

मदुराई: जल्लिकट्टू स्पर्धेत सर्वाधिक बैलांना काबूत आणणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने सरकारी नोकरी देणार असल्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केली आहे. तसेच, जल्लिकट्टूसाठी प्रसिद्ध असलेल्या अलंगनल्लूरमध्ये स्थानिक बैलांसाठी अत्याधुनिक पशुसंवर्धन रुग्णालय स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अलंगनल्लूर येथे आयोजित प्रतिष्ठित जल्लिकट्टू स्पर्धेच्या कार्यक्रमात शनिवारी पुरस्कार वितरण करताना ते बोलत होते. जल्लिकट्टू स्पर्धांमध्ये सर्वाधिक बैलांना काबूत आणून विक्रम करणाऱ्या व्यक्तींना पशुसंवर्धन विभागात प्राधान्याने योग्य नोकरी दिली जाईल. तामिळनाडूच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या तरुणांच्या साहसाचा गौरव करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी, पारंपरिक जल्लिकट्टू खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या अलंगनल्लूरमध्ये २ कोटी रुपये खर्चाने अत्याधुनिक पशु रुग्णालय उभारण्याचा उद्देश असून, तेथे स्थानिक बैलांचे वैज्ञानिक पद्धतीने संरक्षण आणि त्यांच्यावर उपचार केले जातील, असेही ते म्हणाले.

शबरीमाला: सोन्याच्या नंतर आता पडी पूजेतही गैरव्यवहार?

तिरुवनंतपुरम: शबरीमाला अय्यप्पा मंदिरातून सोने गायब झाल्याच्या प्रकरणाने खळबळ उडवून दिलेली असतानाच, आता आणखी एका गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. पडी पूजेच्या देणगी वाटपातही भ्रष्टाचार आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे.

याबद्दल दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या (VACB) गुप्तचर विभागाने खुलासा केला आहे. पवित्र पडीपूजेचे बुकिंग, भक्तांना तिकीट वाटपात निश्चित दरापेक्षा अनेक पटींनी जास्त दराने विक्री, पैसे देणाऱ्यांना पूजेत प्राधान्य यांसारखे अनेक गैरप्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतकेच नाही, तर त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे (TDB) कर्मचारी आणि इतर एजंट यात सामील असल्याचेही नमूद केले आहे.