नवीन वर्ष सुरू होताच जानेवारी ते मार्च महिन्यात स्मार्टफोन कंपन्या एकामागोमाग एक नवीन मॉडेल्स का लाँच करतात? यामागे ग्राहकांची मानसिकता, आर्थिक गणितं आणि कंपन्यांची खास मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी काम करते, हे जाणून घेऊया.

नवीन वर्ष सुरू झालं की स्मार्टफोन मार्केटमध्ये एक वेगळीच धामधूम बघायला मिळते. जानेवारी ते मार्च या पहिल्या तीन महिन्यांत तर नव्या फोन्सचा जणू पाऊसच पडतो. सोशल मीडियावर अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि कॅमेरा कंपॅरिझनची नुसती गर्दी होते. यावर्षीही हाच ट्रेंड कायम आहे. सॅमसंगने फेब्रुवारीच्या शेवटी झालेल्या 'गॅलेक्सी अनपॅक्ड' इव्हेंटमध्ये गॅलेक्सी एस26 अल्ट्रा, गॅलेक्सी एस26 आणि एस26+ मॉडेल्स सादर केली. मार्च महिन्यापर्यंत हे फोन्स बाजारात उपलब्धही झाले.

त्याचवेळी, शाओमीने आपले शाओमी 17 आणि शाओमी 17 अल्ट्रा हे मॉडेल्स जागतिक बाजारात आणले. ॲपलनेही आयफोन 17e लाँच केला. भारतात विवोने व्ही70 आणि व्ही70 एलीट हे दोन मॉडेल्स लाँच केले. झाइस (Zeiss) सोबत मिळून बनवलेली कॅमेरा सिस्टीम आणि दमदार बॅटरी लाईफ ही या फोन्सची मुख्य वैशिष्ट्ये होती. तर गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी आयक्यूने (iQOO) परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित केलेला आयक्यू 15आर बाजारात आणला.

स्मार्टफोन लाँचच्या वेळेमागचं 'टायमिंग'चं गणित

मिड-रेंज सेगमेंटसाठीही वर्षाची सुरुवात खास असते. परीक्षांचा काळ, कॉलेज ऍडमिशन, नव्या आर्थिक वर्षात होणारी पगारवाढ या सगळ्यामुळे या काळात नव्या फोनची मागणी वाढते. शिवाय, नवीन वर्षाचा बोनस आणि सणासुदीनंतर लोकांचा खर्च करण्याचा मूड असतो, त्यामुळे ग्राहक नवीन डिव्हाइस घ्यायला उत्सुक असतात. मोबाइल मार्केटमधले तज्ज्ञ सांगतात की, हे लाँचिंगचं टायमिंग काही अचानक ठरलेलं नाही. कंपन्या ग्राहकांचा कल आणि प्रोडक्ट लाईफ सायकलचा अभ्यास करूनच लाँचची वेळ ठरवतात. यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह निर्माण होतो आणि प्रत्येक लाँच हा फक्त एक सेल न राहता, एक वार्षिक सोहळा बनतो.

सॅमसंगने यावर्षी '72-तास एंगेजमेंट सायकल' नावाची एक भारी आयडिया वापरली. पहिल्या 24 तासांत टेक रिव्ह्यूअर्सनी फोन तपासला. पुढच्या टप्प्यात लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर्सनी कॅमेरा आणि AI फीचर्सबद्दल सांगितलं. आणि शेवटच्या टप्प्यात गेमिंग टुर्नामेंट्स घेऊन फोनच्या परफॉर्मन्सची चाचणी केली. डिजिटल प्रचारासोबतच त्यांनी होर्डिंग्ज वगैरे लावून हायब्रीड मार्केटिंग मॉडेल वापरलं.

जागतिक स्तरावरही लाँचची ही वेळ महत्त्वाची आहे. ॲपल सहसा सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन लाँच करते. सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या विक्रीवर डोळा ठेवून ही रणनीती आखली जाते, ज्यामुळे कंपनीच्या वार्षिक कमाईत मोठा वाटा उचलला जातो. काउंटरपॉइंट रिसर्चच्या रिपोर्टनुसार, 2025 मध्ये जागतिक स्मार्टफोन शिपमेंटमध्ये सुमारे दोन टक्के वाढ झाली. पण 2026 मध्ये चिपची कमतरता आणि पार्ट्सच्या वाढत्या किमती एक आव्हान ठरू शकतात, असा अंदाज आहे. भारतात जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाचा मोठा हिस्सा आता डिजिटल माध्यमांकडे वळत आहे. यातलाही बहुतांश खर्च मोबाईल प्लॅटफॉर्म्सना मिळतो. त्यामुळे, स्मार्टफोन लाँच आता फक्त हार्डवेअरची घोषणा नसून, जास्तीत जास्त लक्ष वेधून घेण्यासाठी आणि मार्केट शेअर मिळवण्यासाठी बनवलेल्या नव्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतील, असं विश्लेषक सांगतात.

थोडक्यात, जानेवारी ते मार्च महिन्यात होणारी ही लाँचची गर्दी योगायोग नाही. तर ग्राहकांची मानसिकता, मीडियाचं अर्थकारण आणि ब्रँडची रणनीती यांचं हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.