shocking news : १६ जानेवारी रोजी यूट्यूब व्हिडिओ पाहून विद्यार्थिनीने स्थानिक औषधांच्या दुकानातून वंगारम (बोरॅक्स) विकत घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते खाल्ल्यानंतर तिला तीव्र उलट्या आणि जुलाब होऊ लागले.

मदुराई : अनेकांना वजन कमी करण्याची इच्छा असते. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असते. योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर जीव जाण्याचाही धोका असतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

१९ वर्षीय तरुणीचा मृत्यू -

वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहिलेले औषध सेवन केल्याने १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तामिळनाडूतील मदुराई येथे घडली आहे. मीनांबलपुरम येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या कलैअरसीचा वजन कमी करण्यासाठी वंगारम (बोरॅक्स) विकत घेऊन सेवन केल्याने प्रकृती बिघडून मृत्यू झाला. 

१६ जानेवारी रोजी यूट्यूब व्हिडिओ पाहून विद्यार्थिनीने स्थानिक औषधांच्या दुकानातून वंगारम विकत घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते खाल्ल्यानंतर तिला तीव्र उलट्या आणि जुलाब होऊ लागले. तिची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, १६ तारखेला संध्याकाळपर्यंत १९ वर्षीय तरुणीची प्रकृती अधिकच खालावली. 

यानंतर तिला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, पण तिचा जीव वाचू शकला नाही. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.