राज्य सरकार आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनमध्ये एक महत्त्वाचा करार झाला आहे. यानुसार, बंगळूरमध्ये 4 हजार कोटी रुपये खर्चात एक हजार खाटांचे मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे.

बंगळूरू: अझीम प्रेमजी संस्थेने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत बंगळूरच्या सरकारी रुग्णालयाला तब्बल 4 कोटी रुपये दिले जाणार आहेत. नेमकं यामागचं कारण काय आहे, हे जाणून घेऊयात. 

चार हजार कोटी रुपये खर्चाचे एक हजार खाटांच्या क्षमतेचे मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने शनिवारी अझीम प्रेमजी फाऊंडेशनसोबत करार केला आहे. विधानसौधच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग बहर यांनी करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, फाऊंडेशन पुढील पाच वर्षांत राजीव गांधी रुग्णालय परिसरात एक हजार खाटांच्या क्षमतेचे मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार आहे.

फाऊंडेशनचे सरकार आभारी

करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, "एक हजार खाटांच्या चॅरिटेबल सुपर स्पेशालिटी मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट रुग्णालयासाठी फाऊंडेशन 5 वर्षांत 4 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. अझीम प्रेमजी आणि त्यांच्या नावाच्या फाऊंडेशनच्या कार्याबद्दल सरकार आभारी आहे. त्यांचे कार्य महान आहे. या कामाला पाठिंबा म्हणून सरकार राजीव गांधी छातीरोग रुग्णालयाच्या आवारातील 10 एकर जमीन 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देत आहे," असे ते म्हणाले.

अझीम प्रेमजी फाऊंडेशन

फाऊंडेशन गेल्या 25 वर्षांपासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सेवा देत आहे. 2021 मध्ये शिक्षक प्रशिक्षणासाठी आणि 2024 मध्ये LKG ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस अंडी देण्यासाठी दीड कोटी रुपये देऊन सहकार्य केले आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'दीपिका शिष्यवृत्ती योजने'अंतर्गत वर्षाला 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी वरदान

वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील म्हणाले की, "नवीन उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या खर्चापैकी 70% खर्च अझीम प्रेमजी फाऊंडेशन उचलणार आहे. उर्वरित खर्च लाभार्थ्यांना करावा लागेल. एकूण 75% खाटा रुग्णांना मोफत दिल्या जातील आणि उर्वरित खाटांसाठी सरकारी रुग्णालयांच्या दरांनुसार शुल्क आकारले जाईल. हे देशातील एक उत्तम कार्य आहे. राज्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 5 हजार आणि यकृत प्रत्यारोपणासाठी 1 हजार लोक प्रतीक्षेत आहेत. त्या सर्वांसाठी हे रुग्णालय वरदान ठरेल," असे ते म्हणाले. यावेळी विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, सरकारचे मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश आणि इतर उपस्थित होते.