Sanjay Raut Press Conference : उबाठामधील सहा खासदारांनी बंड केल्यानंतर संजय राऊतांनी जोरदार टिका केली. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकरांनासह एकनाथ शिंदे यांनाही खडेबोल सुनावले आहेत.
Sanjay Raut Press Conference : उबाठामधून सहा खासदार बाहेर पडल्याने राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. शिवसेना पक्षाचा ६० वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. तर खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर आणि इतर बंडखोर खासदारांवर कडाडून हल्लाबोल केला. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही खडेबोल सुनावले आहेत.

वर्धापन दिनानंतर आरोप-प्रत्यारोप
'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेदरम्यान शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ठाकरे गटाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात, तर शिंदे गटाचा मेळावा नेस्को सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना लक्ष्य केले. याशिवाय बंडखोर खासदारांवर कठोर शब्दांत टीका केली.
ओमराजे निंबाळकरांवर राऊतांचा निशाणा
मेळाव्यात संजय राऊत यांनी भाषण केले नाही. पण दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी थेट ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी राजकरणात मोठं केल. पण त्यांच्यासोबत बेईमानी करण्यात आली. ओमराजे, आष्टीकर गेले, जाऊ द्या. शेणातील किडा शेणात गेला". शाराशिवच्या प्रचारासाठी उद्धव यांच्यासोबत स्वत: तीन दिवस फिरलो. उद्धवजींनी 90 हून अधिक बैठका घेतल्याचीही आठवण राऊतांनी करून दिली.
उद्धव ठाकरे यांचेही प्रतिउत्तर
षण्मुखानंद सभागृहातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी स्वतःवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी म्हटले की, "मी भेटत नाही, आदित्य फिरत नाही, असे म्हणणारेच माझ्या भेटीमुळे निवडून आले,". यावेळी उद्धव यांनी ओमराजे निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
एकनाथ शिंदेंनाही राऊतांचे प्रत्युत्तर
शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी "मी डॉक्टर नसूनही मोठमोठी ऑपरेशन्स करतो," असे वक्तव्य केले. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "राजकारणात पदे कायमस्वरूपी नसतात. आज ते उपमुख्यमंत्री आहेत, उद्या नसतील. एकेकाळी इतर नेत्यांकडेही सत्ता होती, पण काळानुसार परिस्थिती बदलली. त्यामुळे कुणीही स्वतःला कायमचे समजू नये." असे म्हणत शिंदेंवरही राऊतांनी निशाणा साधला.


