Bhiwandi : भिवंडीत रस्त्यालगच्या एका स्टॉलवर शॉवर्मा खाल्ल्याने 88 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाकडून स्टॉलच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Bhiwandi : भिवंडीमधील खंडूपाडा परिसरातील एका स्टॉलवर शॉवर्मा खाल्ल्यानंतर 88 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुकानातून रुग्णांनी शॉवर्मा, पिझ्झासह फालुदा खाल्ल्याचे सांगण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या प्रकारात 14 लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व रुग्णांना इंदिरा गांधी स्मारक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. फूड स्टॉलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय दुकानाला टाळेही लावण्यात आले.

शॉवर्मा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली
भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील 'फेमस शॉवर्मा' या रस्त्यालगतच्या दुकानात खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली. यामध्ये अनेक नागरिकांनी शॉवर्मा, पिझ्झा आणि फालुद्या खाल्ल्याचे सांगण्यात आले. यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळपासून अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, मळमळ आणि तापाचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने रुग्णांना तातडीने इंदिरा गांधी स्मारक (आयजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले.
88 रुग्णांमध्ये 14 बालकांचा समावेश
विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसभरात वाढला गेला. संध्याकाळपर्यंत एकूण 88 नागरिकांना फेमस शॉवर्माच्या स्टॉलवरुन खाल्ल्यानंतप विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत 41 पुरुष, 33 महिला आणि 14 लहान मुलांना विषबाधा झाली आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
FDA कडून दुकानाला टाळे
घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित दुकानाला टाळे लावण्यात आले आहे. तसेच खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शांतिनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकान मालक दिलशाद अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


