NCP Ajit Pawar fraction remove Rupali Patil and Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतर्गत वादामुळे रुपाली पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवले आहे.
NCP Ajit Pawar fraction remove Rupali Patil and Amol Mitkari : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) काही महत्त्वपूर्ण अंतर्गत बदल करताना दिसत आहे. पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच प्रवक्त्यांच्या यादीत मोठा फेरबदल करत दोन महत्त्वाच्या नेत्यांना पदावरून दूर केले आहे.
अंतर्गत वादांमुळे दोन नेत्यांना पदावरून हटवले
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानांमुळे महायुतीच्या अंतर्गत संबंधात तणाव निर्माण होत होता. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी कठोर निर्णय घेत रुपाली पाटील आणि अमोल मिटकरी या दोन्ही नेत्यांना प्रवक्तेपदावरून हटवले आहे.
१७ नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर
या फेरबदलांनंतर अजित पवार यांनी सोमवारी पक्षाच्या १७ नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.
नवीन प्रवक्त्यांची यादी:
अनिल पाटील
चेतन तुपे
सना मलिक
हेमलता पाटील
राजीव साबळे
सायली दळवी
रुपाली चाकणकर (यांचा समावेश पुन्हा प्रवक्तेपदी करण्यात आला आहे.)
आनंद परांजपे
राजलक्ष्मी भोसले
प्रतिभा शिंदे
प्रशांत पवार
शशिकांत तरंगे
ब्रिजमोहन श्रीवास्तव
अविनाश आदिक
सुरज चव्हाण
विकास पासलकर
श्याम सनेर
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या बदलांची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, संजय तटकरे यांची कार्यालयीन चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रुपाली पाटील यांच्यावर कठोर कारवाई का?
रुपाली पाटील यांच्यावर कारवाई होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात घेतलेली आक्रमक भूमिका. रुपाली पाटील यांनी थेट पक्षाच्याच नेत्या असलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर मृत महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन केल्याचा गंभीर आरोप केला होता. एकाच पक्षाच्या दोन प्रमुख महिला नेत्यांमध्ये झालेल्या या सार्वजनिक आरोप-प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली होती. पक्षाने मागील आठवड्यात रुपाली पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पाटील यांनी या नोटीशीला कायदेशीर उत्तर देण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांचे उत्तर येण्यापूर्वीच संतप्त झालेल्या पक्षनेतृत्वाने तातडीने त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली.
वादग्रस्त सुरज चव्हाण यांच्यावर पुन्हा विश्वास
या फेरबदलात एका महत्त्वपूर्ण नावाचा समावेश आहे, ते म्हणजे सुरज चव्हाण. काही महिन्यांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून सुरज चव्हाण यांना युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्या घटनेनंतर आता पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यांना प्रवक्तेपदी नियुक्त केले आहे.
या फेरबदलांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिस्त आणि नियंत्रण राखण्याचा स्पष्ट संदेश अजित पवार यांनी दिला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


