Hormuz Strait Tanker Attack : होर्मुझ सामुद्रधुनीत ‘एमकेडी व्योम’ टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील 33 वर्षीय खलाशी दीक्षित सोलंकी यांचा मृत्यू झाला.  

Hormuz Strait Tanker Attack : मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय खलाशी दीक्षित सोलंकी यांचा होर्मुझ सामुद्रधुनीत टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला. १ मार्च रोजी ५९ हजार मेट्रिक टन पेट्रोल वाहून नेणाऱ्या MT MKD Vyom या टँकरवर क्षेपणास्त्र आदळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कांदिवलीतील सोलंकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमुळे वाढली चिंता

होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे खलाशी मृत्युमुखी पडणे, बेपत्ता होणे आणि जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर National Union of Seafarers of India (NUSI) ने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पलाऊ ध्वजांकित ‘स्कायलाईट’ टँकरवरील दोन क्रू मेंबर्स बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे.

भारतीय दूतावासांशी समन्वय सुरू

या घटनेनंतर NUSI बगदाद आणि इराणमधील बंदर अब्बास येथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधत मदतकार्य करत आहे. हल्ल्यानंतर एमकेडी व्योमवरील उर्वरित क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे ओमानमध्ये उतरवण्यात आले आहे. जहाजावरील आग विझवण्यात आली असून कोणतेही प्रदूषण न होता जहाज स्थिर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

80 दिवसांपासून जहाजावर सेवा

दीक्षित सोलंकी हे 10 डिसेंबर 2025 रोजी ऑइलर म्हणून एमकेडी व्योम टँकरवर रुजू झाले होते. दुर्घटना घडली तेव्हा ते जवळपास 80 दिवसांपासून जहाजावर कार्यरत होते. 8 फेब्रुवारीला हे जहाज युरोपमधून निघाले होते आणि सौदी अरेबियातील रास तनुरा बंदराकडे जात असताना त्यावर हल्ला झाला. स्फोटानंतर सोलंकी बेपत्ता झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इतर क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवले

उर्वरित 21 क्रू सदस्यांना MT Sand या जहाजाने सुरक्षितपणे वाचवले. सध्या ते Muscat येथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून लवकरच मायदेशी परतण्याची शक्यता आहे. दरम्यान जहाज अजूनही समुद्रात वाहत असल्याची माहिती NUSI चे सरचिटणीस मिलिंद खांडलगावर यांनी दिली.

आईच्या निधनानंतर नुकताच कामावर परतला होता

दीक्षित सोलंकी हे कांदिवली पश्चिमेतील महावीर नगर येथील एमएचबी कॉलनीत राहत होते. काही आठवड्यांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्या दुःखातून सावरल्यानंतर ते पुन्हा जहाजावर ड्युटीवर रुजू झाले होते. शेजाऱ्यांच्या मते ते अतिशय शांत आणि नम्र स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.