Dadar Best Bus Accident : दादर प्लाझा टॉकीज परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा मृत्यू आणि चारहून अधिक जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बसने अनेक वाहनांना धडक दिली, ज्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.
Dadar Best Bus Accident : मुंबईतील दादर प्लाझा टॉकीज परिसरात आज सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे बसने समोर असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चारहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात
मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या दादर प्लाझा टॉकीज परिसरात सकाळी सुमारे 9.30 वाजता बेस्ट बस क्रमांक 463 चा भीषण अपघात झाला. धारावीहून दादरच्या दिशेने येणारी ही बस प्लाझा सिनेमाजवळ आली असताना चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि अपघात घडला.
अनेक वाहनांना जोरदार धडक
नियंत्रण सुटलेल्या बसने समोर असलेल्या ट्रेलरला प्रथम धडक दिली आणि त्यानंतर काही दुचाकी व इतर वाहनांना जोरदार धडक बसली. यामध्ये एका दुचाकीला बसखाली चिरडले गेल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.
जखमींची संख्या वाढण्याची शक्यता
या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये रिषभ गुप्ता, सतीश वाघांब्रे आणि महेश डोईफोडे यांचा समावेश असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
वर्दळीच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी
अपघात घडलेला परिसर अत्यंत वर्दळीचा असून प्लाझा टॉकीज, कोतवाल गार्डन परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत मोठी गर्दी असते. अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
इलेक्ट्रिक बसचा अपघात; सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न
प्राथमिक माहितीनुसार ही बेस्टची इलेक्ट्रिक बस असल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाच्या नियंत्रणातील त्रुटीमुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही मुंबईत बेस्ट बस अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे बस चालकांचे प्रशिक्षण आणि मानसिक स्थिती यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिस तपास सुरू
घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील कारवाई केली जाणार आहे.


