Sandhurst Road Station Accident: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ ट्रॅकवरून चालणाऱ्या 4 प्रवाशांना मागून येणाऱ्या लोकल ट्रेनने धडक दिली, ज्यात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला, 2 जखमी झाले.

मुंबई: मुंबईकरांसाठी गुरुवारी संध्याकाळची वेळ अत्यंत क्लेशदायक ठरली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली असताना, दुसरीकडे सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात घडला. लोकल सेवा थांबल्यामुळे अनेक प्रवाशांनी नाईलाजाने रेल्वे ट्रॅकवरून चालत आपले ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, ट्रॅकवरून चालणाऱ्या चार प्रवाशांना मागून येणाऱ्या लोकल ट्रेनने धडक दिली. या अपघातात दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, CSMT वरून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल ट्रेनने ट्रॅकवरून चालणाऱ्या चार प्रवाशांना उडवले. जखमींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा ठप्प

मुळात ही दुर्घटना होण्यामागे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन कारणीभूत ठरले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी जूनमधील मुंब्रा दुर्घटनेतील दोन अभियंत्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी संध्याकाळी आंदोलन पुकारले होते. या अभियंत्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. ऐन गर्दीच्या (Peak Hours) वेळी सीएसएमटी, दादर, ठाणे अशा महत्त्वाच्या स्थानकांवर आंदोलन झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यांचे मोठे हाल झाले.

आंदोलनाची वेळ: गुरुवारी संध्याकाळी, जेव्हा मुंबईकर घरी परतत होते, तेव्हाच हे आंदोलन झाले.

प्रवाशांचा संताप: सहा महिन्यांपूर्वीच्या दुर्घटनेसाठी पुन्हा प्रवाशांना वेठीस धरल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जबाबदारी कोणाची? प्रवाशांचा सवाल

संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यावर सेवा पूर्ववत झाली. 'दोन अभियंत्यांवरील गुन्हे मागे घेण्यावर लवकरच तोडगा काढू' या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन थांबवले. मात्र, लोकल सेवा थांबल्यामुळे मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड दरम्यान अनेक प्रवासी रुळावरून चालत होते. याच दरम्यान, मागून आलेल्या अंबरनाथ फास्ट लोकलने त्यांना धडक दिली.

प्रवाशांचा आरोप आहे की, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळेच हा अपघात झाला. दोन निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? आंदोलनकर्त्यांवर किंवा प्रशासनावर कोणती कारवाई होणार? असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आणि प्रवाशांच्या सुरक्षेची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे.