Mumbai : महाविकास आघाडीने मुंबईतील मतदार यादीतील घोळांविरोधात १ नोव्हेंबरला मोठा मोर्चा जाहीर केला आहे. सध्या न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली असून काँग्रेसच्या अंतिम निर्णयानंतर पुढील आंदोलनाचा आराखडा ठरणार आहे.  

Mumbai : मुंबईतील मतदार यादीतील कथित घोळांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने १ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मोर्चाचा मार्ग आणि वेळ निश्चित करण्यात आली. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन आझाद मैदानमार्गे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे.

न्यायालयात जाण्याची भूमिका

बैठकीत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा पर्यायही चर्चेला आला; मात्र तो निर्णय सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा ठरेल, असे मत नोंदविण्यात आले. त्यामुळे निवडणुकांना थेट विरोध न करता न्यायालयात धाव घेण्याची भूमिका आघाडीकडून घेतली जात आहे. सरकार आंदोलन मोडून काढू शकते, अशीही चर्चा आघाडीच्या नेत्यांत झाली.

काँग्रेसची भूमिका निर्णायक

बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. काँग्रेसचे निर्णय दिल्लीमध्ये घेतले जात असल्याने नसिम खान यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काँग्रेस वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून लवकरच भूमिकेची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अंतिम निर्णय काँग्रेसकडून होणाऱ्या घोषणेनंतरच ठरेल.

मोर्चात सर्व विरोधी पक्ष आणि मनसेचा सहभाग

या मोर्चात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे. बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब, नसिम खान, बाळा नांदगावकर आदी नेते उपस्थित होते.

मोर्चाचे उद्दिष्ट

‘उबाठा’ नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभारावर, मतचोरीवर, आणि मतदार यादीतील त्रुटींवर हा “सत्याचा मोर्चा” निघत आहे. जनतेसमोर सत्य आणण्याचा हा प्रयत्न आहे. पोलिसांशी चर्चा करून मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला असून नागरिकांच्या व्यवस्थेसाठी उद्या QR कोडही जाहीर केला जाणार आहे.