सार
मुंबई: एअर इंडियाच्या २५ वर्षीय महिला वैमानिकाने सोमवारी पहाटे मुंबईतील तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये डेटा केबलच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. सृष्टी तुली असे आत्महत्या केलेल्या वैमानिकेचे नाव आहे. ती मरोळ परिसरातील कनाकिया रेन फॉरेस्ट इमारतीत राहत होती.
तुलीच्या एका नातेवाईकाने तिच्या प्रियकराने तिचा छळ आणि गैरवर्तन केल्याचा आणि तिला मांसाहार बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी तिचा प्रियकर आदित्य पंडित (२७) याला ताब्यात घेतले.
पायलट कोर्स करत असताना भेटले आदित्य आणि सृष्टी
मुळची उत्तर प्रदेशची असलेली सृष्टी कामानिमित्त मागील वर्षीच्या जुनपासून मुंबईत राहत होती. ती आणि पंडित दोन वर्षांपूर्वी दिल्लीत व्यावसायिक पायलट कोर्स करत असताना भेटले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले.
सुसाईड नोट सापडली नाही
आदित्य कारने दिल्लीला जात असताना सृष्टीने आत्महत्या केल्याचे उघड झाले. गाडी चालवताना सृ्ष्टीने त्याला फोन करून आयुष्य संपवणार असल्याचे सांगितले. आदित्य ताबडतोब मुंबईला परतला आणि त्याला तिच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. आदित्यने चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा त्याला सृष्टीने डाटा केबलने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर तिला सेव्हन हिल्स हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घरात कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार दिवसांची पोलीस कोठडी
सृष्टीच्या नातेवाईकाने नंतर पोलिसांकडे तक्रार केली की आदित्य तिचा अनेकदा छळ करायचा आणि सार्वजनिक ठिकाणी तिचा अपमानही करायचा. तसेच त्याने तिला तिच्या खानपाणाच्या सवयी बदलण्यासाठी दबाव देखील आणला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने असेही सांगितले की काकांच्या तक्रारीच्या आधारे, आदित्यला भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा:
सायबर फ्रॉडमध्ये माजी शिप कॅप्टनने गमावले ११ कोटी रुपये; एकाला अटक
युवकाने लिव्ह इन पार्टनरची बलात्कार करून केली हत्या, मृतदेहाचे केले ४०-५० तुकडे