सार
मुंबई: एका ७५ वर्षीय निवृत्त शिप कॅप्टनने शेअर बाजारातील गुंतवणुकीवर फायदेशीर परतावा देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या सायबर फसवणूक योजनेत चार महिन्यांत तब्बल ११.१६ कोटी गमावले आहेत,असे पोलिसांनी सांगितले.
या सायबर फसवणूकप्रकरणी कैफ इब्राहिम मन्सुरी या हिस्ट्रीशीटरला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे पोलिसांना विविध बँकाचे ३३ डेबिट कार्ड आणि १२ चेकबुक सापडले आहेत,असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
भरघोस परतावा देण्याचे दाखवले आमिष
शेअर बाजारातील गुंतवणुकीत रस असलेल्या कॅप्टनला फसवणूक करणाऱ्यांनी स्टॉकमधील गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला, कॅप्टन यांना त्यांच्या ऑनलाइन गुंतवणूक खात्यात नफा दिसला. परंतु, जेव्हा त्यांनी आपली कमाई काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना २० टक्के सेवा कर शुल्क भरण्यास सांगण्यात आले. कॅप्टनला फसवणुक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,असे अधिकाऱ्याने सांगितले.
अनेक बँक खाती वापरून काढून घेतले पैसे
पोलिसांनी सांगितले की, यावर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान कॅप्टन यांची ११.१६ कोटी रुपयांची फसवणुक झाली. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की फसवणूक करणाऱ्यांनी अनेक बँक खाती वापरून पैसे काढून घेतले होते.या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून कॅप्टन यांनी २२ व्यवहार केले होते. दोन खात्यांचा मागोवा घेतल्यावर पोलिसांना असे आढळले की केवायसी पडताळणीसाठी पॅनकार्ड प्रदान केलेल्या महिलेने चेकद्वारे ६ लाख लाख काढले होते. महिलेची चौकशी केली असता तिने कैफ इब्राहिम मन्सुरी याच्या सांगण्यावरून पैसे काढल्याचे कबूल केले.
पोलिसांनी मन्सुरीला दक्षिण मुंबईत अटक केली आहे. त्याच्याकडे १२ वेगवेगळ्या बँक खात्यांशी जोडलेली ३३ डेबिट कार्ड सापडली आहेत.ज्याचा वापर कॅप्टन यांच्या निधीतून ४४ लाख हस्तांतरित करण्यासाठी केला गेला होता.
हेही वाचा:
युवकाने लिव्ह इन पार्टनरची बलात्कार करून केली हत्या, मृतदेहाचे केले ४०-५० तुकडे