Mumbai Municipal Election : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोठी सभा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी शिवसेना (दोन्ही गट), मनसे आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे.

Mumbai Municipal Election : महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचारासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मोठ्या सभा घेण्यासाठी शिवाजी पार्कला नेहमीच प्राधान्य दिले जाते. यंदाही दोन्ही शिवसेना, मनसे आणि भाजपकडून शिवाजी पार्क मैदान आरक्षित करण्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

१० ते १३ जानेवारीच्या तारखांसाठी अर्ज

१५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराची सांगता मोठ्या सभेने व्हावी, यासाठी १० ते १३ जानेवारी या तारखांना सर्वाधिक मागणी आहे. याच कालावधीत सभा घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिंदे गटाची शिवसेना, मनसे आणि भाजप यांनी महापालिकेच्या जी उत्तर वॉर्डकडे शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज सादर केले आहेत.

मनसे, शिवसेना आणि भाजपचे स्वतंत्र अर्ज

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी मनसेकडून ११ आणि १२ जानेवारी या दोन तारखांसाठी अर्ज करण्यात आल्याची माहिती दिली. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ११ ते १३ जानेवारीदरम्यान कोणत्याही एका दिवसासाठी सभेची परवानगी मागण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही शिवाजी पार्क मैदानासाठी महापालिकेकडे अर्ज सादर केल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिकेकडून निर्णय लवकरच अपेक्षित

मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चार प्रमुख राजकीय पक्षांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज दाखल केले आहेत. काही पक्षांनी दोन, तर काही पक्षांनी तीन तारखांचा पर्याय दिला आहे. या सर्व अर्जांचा अहवाल तयार करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.