सार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अशातच अशोक चव्हाण भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Ashok Chavan Resigns from Congress :  लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानंतरच अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

अशोक चव्हाणांचे ट्विट 
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत म्हटले की, “आज सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.”

दरम्यान, अशोक चव्हाण नांदेड येथील काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांचा पक्ष सदस्यस्त्वाचा राजीनामा
अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील पक्ष सदस्यस्त्वाचा राजीनामा दिला आहे. राजूकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

अशोक चव्हाणांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतल्यानंतर भाजपात हालचाली सुरू
अशोक चव्हाणांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतल्यानंतर भाजपात हालचालींना वेग आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसर, पक्षाचे वरिष्ठ नेते अशीष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे भाजपच्या कार्यालयात आहेत. येथे थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका
काँग्रेसला महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झटके बसत आहेत. अशोक चव्हाण यांच्याआधी राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. यानंतर बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांचा गट राष्ट्रपती काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आणखी वाचा : 

अजित पवार यांचीच खरी NCP, लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा झटका

शिवसेना गटाचे माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने मृत्यू, मुंबई पोलिसांनी दिली माहिती

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव