Mira-Bhyandar Mayor : मीरा–भाईंदर महानगरपालिकेत ‘मराठी महापौर’ या मागणीचा विरोध डावलून भाजपच्या डिंपल मेहता महापौरपदी निवडून आल्या आहेत. त्यांना 79 मते मिळाली असून, उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील निवडून आले आहेत.  

Mira-Bhyandar Mayor : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, मीरा–भाईंदर महानगरपालिकेत महापौरपदावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘मराठी महापौरच हवा’ या मागणीवरून मराठी एकीकरण समितीकडून विरोध होत असतानाही भाजप उमेदवार डिंपल मेहता यांचे नाव अखेर महापौरपदासाठी निश्चित झाले आहे.

महापौरपदावरून मीरा–भाईंदरमध्ये वाद

महापौरपदाच्या निवडीवरून मीरा–भाईंदर शहरातील राजकारणाला वादग्रस्त वळण लागले. अमराठी महापौर नको, असा सूर मराठी एकीकरण समितीकडून लावण्यात आला होता. मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करत भाजपने एकगठ्ठा मतदान करत आपला उमेदवार निवडून आणला.

डिंपल मेहता यांचा विजय निश्चित

अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर झालेल्या मतदानात भाजपच्या सर्व 78 नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकाने डिंपल मेहता यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे एकूण 79 मतांसह डिंपल मेहता महापौरपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील

मीरा–भाईंदर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदासाठी भाजपकडून ध्रुवकिशोर पाटील यांना 79 मते मिळाली असून, ते उपमहापौरपदी निवडून आले आहेत.

मतविभागणी काय सांगते?

काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूने मीरा–भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी मतदान केले. डिंपल मेहता यांना 79 मते, तर रुबीना शेख यांना 16 मते मिळाल्याने डिंपल मेहता मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.

प्रताप सरनाईक यांची मराठी एकीकरण समितीवर टीका

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर जोरदार टीका केली आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, ही समिती अचानक कुठून आली? निवडणुकीदरम्यान उबाठा आणि मनसेला पाठिंबा देऊन आमचे 28 नगरसेवक पाडले गेले. त्यावेळी साथ दिली असती, तर आज आंदोलनाची वेळ आली नसती. याआधी गीता जैन महापौर झाल्या, नरेंद्र मेहता आमदार झाले, तेव्हा आंदोलन का झाले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘मराठी महापौर’ मुद्द्यावर आंदोलन सुरूच

मीरा–भाईंदर महानगरपालिका निवडणुकांनंतर ‘मराठी महापौर’ या मुद्द्यावर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज दाखल केल्यानंतर एमएमआरमधील पहिला अमराठी महापौर मिळण्याची शक्यता स्पष्ट झाली होती. त्यानंतर मनसेसह मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली असून, महापालिकेच्या बाहेर आंदोलनही करण्यात आले. मात्र भाजपच्या एकगठ्ठा मतदानामुळे आता अमराठी महापौर निश्चित झाल्याचे चित्र आहे.