उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेसाठी हिंदुत्व आणि मराठी माणूस सोडल्याचा आरोप केला. २०१९ च्या निवडणुकीत मराठी माणसाचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणाले.
मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, शिंदे यांनी त्यांना सत्तेसाठी लाचार आणि अगतिक झाल्याचा आरोप केला. शिंदे म्हणाले, "उद्धव ठाकरे सत्तेसाठी इतके लाचार झाले की त्यांनी हिंदुत्व सोडून दिले. महाराष्ट्रातील जनतेशी आणि मतदारांशी त्यांनी विश्वासघात केला. आता निवडणुका जवळ आल्याने त्यांना पुन्हा हिंदुत्व आणि मराठी माणूस आठवत आहे."
२०१९ साली मराठी माणसांचा विश्वासघात
शिंदे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ठाकरे गटावर निशाणा साधला. "२०२४ च्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट केवळ २३ टक्के आहे. मतदारांनी त्यांना कधीच 'टाटा-बाय-बाय' केले आहे. आमच्याकडे आत्मविश्वास आहे, तर त्यांच्याकडे अहंकार आहे आणि हा अहंकारच त्यांना विनाशाकडे नेत आहे," असे शिंदे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप कोणी केले, हे महाराष्ट्राला माहीत आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचे काम कोणी केले हेही आपल्याला माहीत आहे. २०१९ साली मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा विश्वासघात करण्यात आला. सरडाही रंग बदलतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडाही महाराष्ट्राने पाहिला, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली.
"बाळासाहेब असते तर..."
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे लाचार झाले, त्यामुळे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत, असे शिंदे ठामपणे म्हणाले. "बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आपला मतदानाचा अधिकारही गमावला, पण त्यांनी हिंदुत्व सोडले नाही. मात्र, स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणाऱ्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. याला महाराष्ट्र साक्षीदार आहे," असे शिंदे यांनी नमूद केले.
शिंदे पुढे म्हणाले, "बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार असणाऱ्या लोकांना त्यांनी उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळेच ते आता उतावीळ आणि लाचार झाले आहेत."
उद्धव ठाकरेंना प्रश्न
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना काही थेट प्रश्नही विचारले. "आम्ही हिंदुत्व सोडले नाही, असे ते म्हणतात. मग बाळासाहेब ठाकरे यांना 'हिंदुहृदयसम्राट' म्हणताना तुमची जीभ का कचरते? हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता?" असे प्रश्न विचारत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.


