Uddhav Thackeray Speech: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला "नॅपकीन"ची उपमा देत त्यांनी पक्षाला "पोरं नसल्याचा" टोला लगावला आणि शिवसैनिकांचे आभार मानले.

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. "मला खरंच कीव येते, जे आपला बाप बदलतात, आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत, अशी लोकं जेव्हा आपल्या घराणेशाहीवर टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते," अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले.

"तुम्हाला पोरं होत नाहीत तर मी काय करू? आमच्याकडे आहेत, घ्यायची असतील तर घ्या!"

ठाकरे यांनी भाजपच्या "पक्षाला मुलं नसतात" या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले, "अरे, तुला राजकारणात पोरं होत नाहीत तर मी काय करू? आमच्याकडे आहेत, घ्यायची असतील तर घे. किती पाहिजेत? कारण भाजप पक्ष असाच आहे," अशी खोचक टीका त्यांनी केली. भाजप दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे घेऊन त्यांना मोठे करते, यावर त्यांनी भर दिला.

Scroll to load tweet…

या संदर्भात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे उदाहरण दिले. "आपण सत्य नाकारतो का कधी? त्यामुळे त्यांनी हे सत्य स्वीकारलं पाहिजे की, त्यांना आजपर्यंत पोरं झाली नाहीत म्हणून त्यांनी दुसऱ्यांचे नेते स्वीकारायचे, ते मोठे करायचे," असे ते म्हणाले. संघावर बंदी घालणाऱ्या पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्याची वेळ भाजपवर आली, हे त्यांचे 'कर्तृत्व' असल्याची टीका करत, "आणि आपल्याला शिकवतात हिंदुत्व," असेही ठाकरे म्हणाले.

“भाजप म्हणजे नॅपकीनसारखा पक्ष!”, ठाकरेंचा टोला

उद्धव ठाकरे यांनी भाजपला "नॅपकीन" ची उपमा दिली. "आपल्या मेळाव्यावर भाजपने पाळलेली बेडूकं हे डरावडराव करतील. ही सर्व पाळीव बेडूकं यायला लागतील. पण या चोरांना खरंच मी म्हणतो, लाज, लज्जा, शरम ठेवलेली नाही. नॅपकीन आहे. तो सुद्धा का ठेवलाय ते कळत नाही, असा हा भाजप," असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसैनिकांचे आभार आणि शिवाजी पार्कमधील पहिल्या मेळाव्याची आठवण

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार मानले. "तुमच्याशी काय बोलायचं? हा मला प्रश्न पडला आहे. हे जे काही चित्र आहे, वातावरण आहे, हे वातावरण मला नाही वाटत की, कुणाच्याही नशिबात येईल. कुणाच्या भाग्याला असं प्रेम लिहिलं असेल ते मला वाटत नाही. अर्थात ही माझ्या पूर्वजांची पुण्याची आणि तुमच्या सर्वांचं अतोनात प्रेम आहे," अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील आठवण करून देताना ते म्हणाले, "शिवसेना आज सुद्धा तरुण आहे आणि नेहमी तरुणच राहणार आहे. शिवसेनेचा पहिला मेळावा हा शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) झाला होता. शिवाजी पार्क प्रचंड भरला होता. 'पैसा फेको, तमाशा देखो' असा जो चोरांचा बाजार चालू आहे तसा तो त्यावेळी नव्हता." त्यावेळी काही जणांनी बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी पार्कात सभा घेण्याचा 'मुर्खपणा' न करण्याचा सल्ला दिला होता, पण बाळासाहेबांनी तो मानला नाही आणि शिवाजी पार्क तुडुंब भरले, अशी आठवण त्यांनी सांगितली.