माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आमदार आणि खासदारांना खास डिनर मीटिंगसाठी मुंबईत आमंत्रित केले आहे. पक्षांतर्गत गळती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांना खास डिनर मीटिंगसाठी मुंबईत आमंत्रित केलं आहे. ही 'डिनर डिप्लोमसी' 20 जून रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पार पडणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ठाकरे गटातून मोठी राजकीय गळती सुरू आहे. एकामागून एक माजी आमदार, पदाधिकारी आणि नेत्या मंडळींनी शिंदे गटात उडी घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण झालं आहे. अशा स्थितीत ही डिनर मीटिंग केवळ सौजन्यभेट आहे की एका रणनीतीचा भाग यावरून चर्चा रंगू लागली आहे.

नेमकं काय चाललंय ठाकरे गटात?

संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तणाव वाढलेला दिसतो आहे. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील काही नेते विरोधी पक्षात प्रवेश करत आहेत. याचदरम्यान ठाकरे गटातील काही खासदारही शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षांतर्गत चर्चेनुसार काही नेत्यांशी ‘चाचपणी’ सुरू आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना एकत्र बोलावून, पक्ष बांधणीचा आणि गटएकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

डिनर डिप्लोमसी, सौजन्य की रणनीती?

या खास डिनर मीटिंगमध्ये केवळ भोजनच नव्हे, तर आगामी राजकीय दिशा ठरवण्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः, मुंबई महापालिकेची निवडणूक, जी ठाकरे गटासाठी ‘प्रतिष्ठेचा सवाल’ आहे. ठाणे, नाशिक, औरंगाबादसारख्या महानगरपालिका, पक्षातील गळती रोखण्यासाठी ठोस पावलं, संभाव्य उमेदवारांची चर्चा ही विषयसूची या बैठकीत उपस्थित राहू शकते.

निवडणूक रणनीतीवर फोकस?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) मुंबई पालिका जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या डिनर बैठकीत, वॉर्डनिहाय रणनीती, सोशल मीडिया प्रचार, स्थानिक पातळीवरील गणित आणि महाविकास आघाडीतील समन्वय यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘जमाव एकत्र करा, मोर्चा तयार ठेवा’

सध्याच्या राजकीय अस्थिरतेत, उद्धव ठाकरे यांच्या डिनर डिप्लोमसीला एकप्रकारे ‘एकजूट राखण्याचा प्रयत्न’ म्हणून पाहिले जात आहे. या बैठकीतून पक्षाला नवीन उभारी मिळते का, गळती थांबते का, आणि ठाकरे गट आगामी निवडणुकांसाठी सज्ज होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.