Sunday Mega Block : मध्य रेल्वेने कर्जत यार्डच्या कामासाठी १९ तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला असून, पाच एक्स्प्रेस आणि काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहा.
Sunday Mega Block : आठवड्याच्या अखेरीस मध्य रेल्वेने मोठा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. कर्जत रेल्वे यार्डच्या पुनर्बांधणीसह आधुनिक सिग्नल प्रणाली स्थापनेसाठी हा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्री १२.२० वाजता सुरू होऊन रविवारी सकाळी ७.२० वाजेपर्यंत चालणार आहे. जवळपास १९ तासांच्या या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, प्रवाशांना अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
पाच महत्त्वाच्या एक्स्प्रेस ट्रेन रद्द
या ब्लॉकदरम्यान पाच प्रमुख एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात खालील गाड्यांचा समावेश आहे:
- सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस (१२१२५/२६)
- डेक्कन क्वीन (१२१२३/२४)
- डेक्कन एक्स्प्रेस (११००८)
- इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८)
- इंद्रायणी एक्स्प्रेस (२२१०६)
या सर्व गाड्या तात्पुरत्या काळासाठी रद्द असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
काही गाड्या पुण्यापर्यंतच धावणार
- ब्लॉकच्या कालावधीत काही दीर्घ पल्ल्याच्या गाड्या केवळ पुणे स्थानकापर्यंतच धावतील.
- कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस (११०३०)
- बंगळुरू-सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस (११३०२)
या दोन्ही गाड्या पुण्यापासून पुढील प्रवासासाठी थांबणार नाहीत. पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास रद्द राहील. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे किंवा पर्यायी वाहतुकीचा वापर करावा.
नऊ मेल-एक्सप्रेस ट्रेन मार्ग बदलून धावणार
या कालावधीत आणखी ९ मेल आणि एक्सप्रेस ट्रेनना पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे. या बदलामुळे काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल. तसेच काही लोकल सेवा तात्पुरत्या बंद राहतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
काही लोकल ट्रेनही रद्द
ब्लॉकदरम्यान खालील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत:
- दुपारी १२.४० ची खोपोली–कर्जत
- दुपारी १.१५ ची कर्जत–खोपोली
- सायंकाळी ६.०२ ची खोपोली–सीएसएमटी
- सायंकाळी ७.४३ ची कर्जत–खोपोली
या लोकल गाड्या पूर्णपणे रद्द राहतील. प्रवाशांनी पर्यायी वेळा किंवा बससेवा वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन — “सेवा अधिक सुलभ होणार”
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी लोकल आणि एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक तपासून मगच प्रवासाचे नियोजन करावे. प्रशासनाच्या मते, या ब्लॉकच्या कामामुळे पुढील काळात रेल्वे सेवा अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होईल.


