राज्यात शिक्षणव्यवस्थेत हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात आता मराठी अस्मिता रक्षणासाठी मोठा एल्गार होताना दिसतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात आता राज्याच्या राजकारणात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा समोर येताना दिसत आहे. खरंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज (27 जून) एक महत्त्वाची घोषणा करत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणणारा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, "हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघणार आहे."
ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो चर्चेत
संजय राऊत यांनी ट्विटरवरून ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे. अनेक वर्षांनंतर दोन्ही बंधूंनी एका सामायिक विषयावर एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. दोघांमध्ये वैचारिक व राजकीय अंतर असले तरी, मराठी अस्मिता, भाषा आणि शिक्षणव्यवस्थेतील हस्तक्षेप यासारख्या मुद्द्यांवर ते एकत्र येण्यास तयार असल्याचं चित्र या घोषणेतून दिसत आहे.
हिंदी सक्तीविरोधात मोर्चा का?
महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये आणि केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांतून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याविरोधात मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिक अस्मितेचं रक्षण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं संजय राऊत यांनी सूचित केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात एक मोर्चा निघणार आहे. आणि हा मोर्चा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन निघेल.”त्यांनी या मुद्द्याला केवळ भाषेचा नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न मानले आहे.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
"महाराष्ट्रातील मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणं सध्या गरजेचं आहे. राज ठाकरेंनी हे आव्हान उभं केलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. जो मोर्चा निघेल, तो केवळ एक आंदोलना नसून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ऐतिहासिक मोर्चा ठरेल," असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हे राजकीय चर्चा करण्यापेक्षा आज मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्र येणं गरजेचं आहे. हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी माणसावर भाषिक लादणी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे एकत्र आवाज उठवणं आणि ताकद दाखवणं हेच अधिक महत्त्वाचं आहे."
राज ठाकरे यांचा एल्गार – ५ जुलैचा मोर्चा
राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलै रोजी मोर्चाची घोषणा केली. "गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा निघणार असून, कोणताही पक्षाचा झेंडा नसेल. फक्त मराठीचा अजेंडा असेल. मराठी माणसावर प्रेम करणाऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे," असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे पुढे म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंशी याबाबत बोलेन. सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्व मराठी बांधवांनी एकत्र यावं. हा मोर्चा केवळ राजकीय नाही, तर मराठी अस्मितेचा लढा आहे."
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


