माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला आहे की गुवाहाटी बंडाच्या वेळी संजय राऊत शिंदे गटात सामील होऊ इच्छित होते, परंतु 30-35 आमदारांनी त्यांना आक्षेप घेतल्याने त्यांचा प्रवेश नाकारला गेला. 

पंढरपूर: महाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट! शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधत एक धक्कादायक दावा केला आहे. पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, गुवाहाटीमधील शिंदे गटाच्या बंडामध्ये संजय राऊत यांनाही सहभागी व्हायचं होतं, मात्र त्यावेळी 30-35 आमदारांनी त्याला आक्षेप घेतला आणि त्यांचा मार्ग बंद झाला.

"राऊतांना विरोध झाला म्हणून ते अजूनही चिडलेले"

शहाजीबापू पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही बंडात सहभागी व्हायचे होते. मात्र अनेक आमदारांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना थांबावं लागलं. त्यामुळेच आजही राऊत सातत्याने एकनाथ शिंदेंवर टीका करत असतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना शिंदे यांचं नेतृत्व मान्य आहे. आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील."

ठाकरे-मनसे युतीवरही शहाजीबापूंची टोलेबाजी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही शहाजीबापूंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेले आहेत. अशा स्थितीत जर राज ठाकरे उद्धव यांच्यासोबत गेले, तर हिंदुत्व सोडल्याचा आरोप राजसाहेबांवर करावा लागेल."

तेजस्वी घोसाळकर यांचं स्पष्टीकरण, “मी अजूनही उद्धवजींसोबतच”

दरम्यान, बँकेच्या संचालकपदावर निवड झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, "मी काही दिवस नाराज होते, मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नाराजी दूर झाली आहे. मी अजूनही त्यांच्यासोबतच आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही."

ते पुढे म्हणाल्या, "सहकार क्षेत्रात माझी ही पहिलीच संधी आहे. अभिषेक यांनी इथे दोन टर्म काम केलं असून त्यांचा अनुभव मोठा आहे. मीही चांगलं काम करून सामाजिक दायित्व निभावण्याचा प्रयत्न करेन. सहकार आणि राजकारण वेगळं ठेवून समाजकार्य करणार आहे."

राजकीय वातावरण तापलंय...!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष अधिक तीव्र होत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आगामी घडामोडींनी सत्ताकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.