राज्य सरकारच्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली, पण तोडगा न निघाल्याने मोर्चाची घोषणा केली. जेएनपीटी भरती प्रकरणीही मनसेने आवाज उठवला.

शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा म्हणजेच हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सर्वच पक्षांनी विरोधातील भूमिका घेतली आहे. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. पण त्या भेटीत काही तोडगा न निघाल्यामुळे हिंदी भाषेच्या विरोधासाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी दिली.

जेएनपीटीने भरतीच केली रद्द 

यावेळी पत्रकार परिषद सुरु असताना जेएनपीटीसाठी होणाऱ्या नोकर भरतीच्या मुलाखती या गुजरातमध्ये होणार अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जेएनपीटी येथे जाऊन अध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेतली आणि गुजरातमध्ये होणारी भरती रद्द केली.

मुलाखती महाराष्ट्रातच होणार 

सगळ्या मुलाखती महाराष्ट्रातच व्हायला हव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. ७० टक्के भरती मराठी मुलांसाठी करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्षांकडे करण्यात आली. राज ठाकरे यांना जेएनपीटीकडून त्यासंदर्भातील पत्र देण्यात आले. यापुढे जेएनपीटी महाराष्ट्रातील मुलांना कशा जास्तीत जास्त नोकऱ्या देता येतील याकडे लक्ष देईल, असं सांगितलं.