Ram Mandir : राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. SIT च्या प्राथमिक रिपोर्ट्सनुसार, अयोध्येतील पोलिसांनी 8 जणांसह काही अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच घटनेसंदर्भात आता संजय राऊतांनी ट्विट केले आहे.
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात SIT च्या प्राथमिक रिपोर्टनंतर पोलिसांकडून 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. याच प्रकरणावरुन आता उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी विधान केले आहे. संजय राऊत यांनी अयोध्येसाठी पक्षाने मंदिराच्या बांधकामासाठी दान केलेल्या वस्तूंबाबात सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक ट्विट केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या बांधकामावेळी पक्षाचे सदस्य आणि संतांच्या उपस्थितीत 4 किलो चांदीच्या विटा दिल्या. याशिवाय 1 कोटी रुपयांना निधी देखील देऊ केला. अशातच विटा गायब होण्यावर गंभीर प्रश्न उपस्थितीत होत आहे. तसेच अनेक वर्षांनंतरही मंदिराच्या ट्रस्टकडून कोणतीही पावती किंवा माहिती नाही. ती वीट नक्की कुठे गेली? चौकशी करण्याची हीच वेळ असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टिकास्र
बुधवारी संजय राऊत यांनी राम मंदिरातील देणगीच्या वादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टिका केली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "या कथित घोटाळ्यासंबंधित लोकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही."
आरोपींच्या विरोधात एफआयार दाखल
राम मंदिराच्या ट्रस्टचे सदस्य श्रीकृष्ण मोहन यांच्या तक्रारीच्या आधारे काही जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, सुभाष चंद्र शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव आणि रामशंकर मिश्रा यांची नावे समोर आली आहे. यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ३१६(५), ३१७(४), ३१७(५), ६१ आणि ३(५) यासह अनेक तरतुदींखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अयोध्येतील समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडे यांनी केलेल्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पवन पांडे यांनी दावा केला होता की, राम मंदिरातील सात ते साडेसात कोटी रुपयांची चोरी करण्यात आली आहे. यामुळे उत्तर प्रदेश सरकारकडून घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी १४ जून रोजी तीन सदस्यांची एसआयटी टीम स्थापन केली होती.


