केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत अनेक गोष्टी उघड होत आहेत. केतनच्या हत्येआधी चेतनने त्याचा फोन त्याच्या दुकानात ठेवला होता आणि तो त्याच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा फोन घेऊन लोहगडावर पोहोचला होता.
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून मारल्याप्रकरणी पोलिसांचा विविध बाजूंनी तपास सुरू आहे. केतनचा मृत्यू झाला त्यावेळी हा केवळ एक अपघात असल्याचं वाटत होतं. मात्र केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिच्या वागणुकीवर, भूमिकेवर संशय आल्यामुळे केतनच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, सिया आणि तिचा प्रियकर चेतनचे कॉल रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक बाबींच्या शोधानंतर सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनची हत्या केल्याचं समोर आलं.

सियाचा प्रियकर चेतनच्या दुकानातील कर्मचाऱ्याची माहिती
पुणे पोलिसांनी केतनच्या हत्येप्रकरणी सियाचा प्रियकर चेतन चौधरी याच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार याचा जबाब घेतला आहे. केतनची ज्या दिवशी हत्या झाली, तो १८ जूनचा दिवस होता. नीरजने दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी चेतनने त्याचा फोन दुकानात ठेवला होता. तर लोहगडावर जाण्यासाठी नीरजचा फोन तो घेऊन गेला होता.
१८ जून रोजी चेतनने त्याच्या दुकानात ठेवलेल्या फोनचं इंटरनेट सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत बंद ठेवलं होतं. पोलिसांनी ज्यावेळी या दिवशीचे त्याचे कॉल तपासले त्यावेळी केवळ त्याला येणारे कॉलच रेकॉर्ड होत होते. फोनचं लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून चेतनने फोन दुकानातच ठेवला होता.
पोलिसांनी नीरजच्या फोनचंही लोकेशन तपासलं. त्यादिवशी नीरजच्या फोनचं लोकेशन लोहगडाजवळ असल्याचं पोलिसांच्या तपासात आढळलं. या संपूर्ण घटनांवरुन पोलीस अधिक तपास करत आहेत. चेतनच्या दुकानात काम करणारा कर्मचारी नीरज याने मोबाईल फोनबाबत दिलेला हा जबाब पोलीस तपासात महत्त्वाचा ठरला आहे. लोकेशन ट्रेस होण्याच्या भीतीने चेतनने त्याचा फोन दुकानात ठेवला असला, तरी त्याच्या भर उन्हात हूडी घातल्याने, संशयास्पद वागणुकीने ते पकडला गेला. सध्या चेतन आणि सिया या दोघांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.


