केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

पुणे : पुण्यात केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने सिया गोयलने हत्या केली. सियाने तिच्या प्रियकरासोबत चेतन चौधरीसोबत मिळून हत्येचा कट रचला आणि केतनला लोहगडावरुन ढकलून त्याची हत्या केली. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विशाल अग्रवाल यांच्याशी चर्चा करत घटनेची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी यात ते स्वत: लक्ष घालून प्रकरणाचं लवकरात लवकर निवारण करुन देतील असं आश्वासन दिलं असल्याचं ते म्हणाले.

तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, दोषींना कठोर शिक्षा व्हावी. माझा २६ वर्षांचा मुलगा गेला. ज्यांनी त्याची हत्या केली त्यांना कमीत-कमी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विशाल अग्रवाल यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विशाल अग्रवाल यांनी पत्रकारांशी चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी केतनच्या लग्नाबद्दल तसंच सियाबद्दल काही गोष्टींची माहिती दिली. केतन विग लागत असल्याने सियाला तो पसंत नसल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत बोलताना केतनच्या वडिलांनी सांगितलं, की केतनला एक विगचा पॅच होता. पण हे लग्न ठरण्याआधीच स्पष्टपणे दाखवलं, सांगितलं गेलं होतं. त्या मुलीसाठी नकार देणं ही गोष्ट खूप सोपी होती. तिला मुलगा पसंत नव्हता, तर तिने सरळ नकार द्यायला हवा होता, पण तिने माझ्या मुलाची हत्या केली. माझ्या मुलाची हत्या करण्याची गरज नव्हती. माझा २६ वर्षांचा मुलगा गेला, त्याची अशीप्रकारे हत्या करण्यात आली ही गोष्ट दुर्दैवी आहे.

YouTube video player

केतनच्या हत्येच्या कटात आणखी काही लोकं सामील असू शकतात असा अंदाजही केतनच्या वडिलांनी वर्तवला आहे. तसंच सियाच्या भावालाही याबाबत माहिती असण्याची शक्यता आहे, कारण ती तिच्या भावाच्या अतिशय जवळ होती, त्यामुळे त्याला माहिती असावं. तसंच सियाचा भाऊ साहिल आणि तिचा प्रियकर चेतन दोघे मित्रही होते. त्यामुळे चेतनबद्दल सियाच्या भावाला साहिलला माहिती असू शकते, तसंच केतनच्या हत्येविषयीदेखील त्याला माहिती असू शकते, असा अंदाज केतनच्या वडिलांनी वर्तवला आहे.