मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी उद्धव ठाकरेही कुटुंबासह 'शिवतीर्था'वर आले होते. 

मुंबई : राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या 'शिवतीर्थ' निवासस्थानावर आज पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब 'शिवतीर्था'वर आले होते. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही नेत्यांचा राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेला वावर, अनेक राजकीय संकेत देऊन गेला आहे.

गणपतीच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्यसह राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले होते. ही भेट गेल्या १७ वर्षांतील कटुतेनंतरचा मैत्रीचा नवा अध्याय म्हणता येईल. या भेटीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही केवळ धार्मिक नसून राजकीय अर्थवाही मानली जात आहे.

राज-फडणवीस मैत्री कायम, पण आता नवा राजकीय संकेत?

फडणवीस हे यापूर्वीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते, पण यावेळी राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी बेस्ट पतपेढी निवडणुकीत राज आणि उद्धव यांनी युती केली होती, मात्र दोघांच्याही पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांची बैठक घेतली आणि आज ते स्वतः ‘शिवतीर्थ’वर आले.

आगामी महापालिका निवडणुकांचा मोठा संदर्भ

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना, ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील ही भेट राजकीय महत्त्वाची ठरते. एकीकडे राज-उद्धव यांची जवळीक वाढताना दिसतेय, तर दुसरीकडे फडणवीस यांच्याशी देखील संबंध कायम असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे राज ठाकरे आगामी निवडणुकांमध्ये नेमकी कुणाच्या सोबत जातील? हे सर्वांच्या उत्सुकतेचं केंद्रबिंदू ठरत आहे.

नव्या राजकीय समीकरणांचा प्रारंभ?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं पुन्हा एकत्र येणं, फडणवीस यांचं त्याच घरात दर्शनासाठी जाणं आणि तीन नेत्यांमध्ये असलेली संवादाची दारे — हे सर्व पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच नवीन गठजोड किंवा समीकरणं उभी राहतील का? असा प्रश्न उपस्थित होतो.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटी केवळ धार्मिक नाहीत, तर आगामी राजकीय डावपेचांचे संकेत देणाऱ्या ठरत आहेत. ‘शिवतीर्था’वरील हलचालींमुळे सियासतच्या गणपतीने महाराष्ट्रातील राजकारणात नवचैतन्य निर्माण केलं आहे, हे मात्र नक्की!