- Home
- Maharashtra
- Thackeray Family Reunion : ठाकरेंचा 'हम साथ साथ है' क्षण! शिवतीर्थावर ऐतिहासिक भेट, पाहा खास फोटो
Thackeray Family Reunion : ठाकरेंचा 'हम साथ साथ है' क्षण! शिवतीर्थावर ऐतिहासिक भेट, पाहा खास फोटो
Ganesh Chaturthi 2025 : अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले. शिवतीर्थवर झालेल्या या भेटी दरम्यान दोन्ही कुटुंबांमध्ये भावनिक क्षण पाहायला मिळाले.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात एक अत्यंत भावनिक आणि चर्चेचा क्षण घडला. अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले, तेही सहकुटुंब. निमित्त होतं गणेशोत्सवाचं, आणि स्थळ होतं राज ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान.
गणपतीने एकत्र आणलं ठाकरे कुटुंब!
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. त्यातच, आजच्या दिवशी उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण परिवारासह (पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे) शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले. यामुळे ही चर्चा आणखीनच जोरात सुरू झाली आहे.
राजकीय नाही, पारंपरिक भेट
उद्धव ठाकरे हे जवळपास 22 वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते. शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं नवीन घर आहे आणि उद्धव ठाकरेंची ही पहिलीच भेट होती. जवळपास दोन तास दोन्ही कुटुंबं एकत्र होती. या काळात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, मात्र शिवसेना (ठाकरे गट) आमदार महेश सावंत यांच्या माहितीनुसार, राज-उद्धव यांच्यात जवळपास 10 मिनिटे खासगी चर्चा झाली होती.
भावनिक क्षण, राजकीय अर्थ
राज ठाकरे यांनी जुलै 2025 मध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. तो देखील एक महत्त्वाचा क्षण होता. त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी येतात, याचा अर्थ राजकीय दृष्टिकोनातून घेतला जात आहे.
आरती, दर्शन आणि एकत्रित क्षण
ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. आरती, दर्शन, गप्पा आणि हसरे चेहरे — हे सगळं पाहून अनेकांना 'हम साथ साथ है' हा चित्रपट आठवला नाही तरच नवल!
शिवतीर्थवर घडलेला हा भेटीचा क्षण भावनिकही होता आणि चर्चास्पदही. राजकीय दृष्टिकोनातून याचा अर्थ निघो निघो, पण गणपतीच्या निमित्ताने ठाकरेंचा एकत्र येणं, महाराष्ट्राच्या राजकारणात एक सकारात्मक संकेत ठरतो का? हे येणारा काळच ठरवेल.

