Ambarnath Train Accident : अंबरनाथजवळील मोरीवली गावात रेल्वे रुळ ओलांडताना हेडफोन लावलेल्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला. तिला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या तरुणाचाही जीव गेला. या घटनेमुळे पादचारी पुलाची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
ठाणे : रेल्वे रुळ ओलांडताना निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचे एक भीषण उदाहरण अंबरनाथजवळील मोरीवली गावात समोर आले आहे. कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडत असताना एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणानेही आपले प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना रविवार, २० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. मोरीवली गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरातील २९ वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील एकाच कंपनीत कामाला होते. कंपनीतून घरी परतत असताना, आतिष वैशाली यांना बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ सोडण्यासाठी गेला होता.
दुर्देवाने, वैशाली कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रुळ ओलांडत असताना, अचानक वेगाने एक रेल्वे आली. आतिष आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला, पण हेडफोनमुळे त्यांना काही ऐकू आले नाही. वैशाली धोत्रे यांना संकटात पाहून, आतिषने क्षणाचाही विलंब न लावता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. रेल्वेने या दोघांनाही धडक दिली, यात दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आतिषच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्ने झाली असून, तो त्याच्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता. त्याच्या अकाली निधनाने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. दुसरीकडे, वैशाली धोत्रे यांना एक मुलगी आणि २२ वर्षांचा मुलगा असून, त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. त्यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच काळाने त्यांच्या कुटुंबावर घाला घातला. या अपघातामुळे धोत्रे कुटुंबाचाही आधार हरपला आहे.
पादचारी पुलाची मागणी पुन्हा ऐरणीवर
या हृदयद्रावक घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड दरम्यान पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासोबतच बाजूला उड्डाणपूल उभारण्याची मागणी यापूर्वीही अनेकदा केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यानंतर या गंभीर समस्येकडे लक्ष देणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.


