Solapur ZP Election : सोलापूर जिल्ह्यातील प्रचारसभांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोहोळमध्ये शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका, असं आवाहन केल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. 

Solapur ZP Election : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील त्यांच्या जाहीर सभांमध्ये विविध पक्षांचे आमदार व्यासपीठावर दिसल्याने चर्चेला उधाण आलं असतानाच, मोहोळमध्ये चक्क शिवसेनेच्या उमेदवारालाच मत देऊ नका, असे आवाहन शिंदेंनी केल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

बार्शी ते मोहोळपर्यंत राजकीय हालचाली

बार्शी येथील सभेत ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल शिंदेंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदेंनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं. तर मोहोळमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांनी शिंदेंचं स्वागत केल्याने वेगळीच राजकीय समीकरणं चर्चेत आली.

मोहोळमध्ये ‘आघाडीचा धर्म पाळा’चं आवाहन

मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती आहे. मात्र, एकाच गणातून दोन उमेदवार उभे राहिल्याने आधीच गोंधळाची स्थिती होती. प्रचारसभेदरम्यान स्थानिक नेत्यांनी दिलेल्या चिठ्ठीनंतर एकनाथ शिंदेंनी व्यासपीठावरून “नरखेड गटात ज्योत्स्ना पाटील या आपल्या उमेदवार नाहीत, येथे आघाडीचा धर्म पाळावा,” असं स्पष्ट केलं. शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारालाच मत देऊ नका, या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ज्योत्सना पाटील प्रकरणावर स्पष्टीकरण

दरम्यान, ज्योत्स्ना पाटील या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार नसल्याचं जाहीर केल्याचं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, नरखेड पंचायत समितीसाठी प्रगती दगडे या शिवसेना–राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. युती असतानाही झालेल्या या गोंधळामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे.