पालघर जिल्ह्यात पोलिसांनी एका ३५ वर्षीय पुरुषाच्या खुनाची चौकशी सुरू केली आहे. या पुरुषाचा मृतदेह त्याच्या स्वतःच्या घराच्या फरशीखाली पुरण्यात आला होता आणि हे कृत्य त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने केल्याचा आरोप आहे.
पालघर - दृष्यम स्टाईल मर्डर उघडकीस आला आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. त्यानंतर त्याला बाथरुमच्या खालील पुरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेत खून झालेल्या पतीचे नाव विजय आहे. तर दृष्यम या चित्रपटात खून लपवण्याचा प्रयत्न करणार्या अजय देवगणचे नाव विजय साळगावकर होते.
मृत व्यक्तीचे नाव विजय चव्हाण असे असून तो गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता होता. अखेर सोमवारी सकाळी त्याचे भाऊ त्याच्या नालासोपारा (पूर्व), गडगपाडा येथील घरी गेले असता ही भीषण घटना उघडकीस आली. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे ७० किमी अंतरावर आहे.
जेव्हा भाऊ घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घरातील काही फरशीच्या टाइल्स नव्याने लावलेल्या व वेगळ्या रंगाच्या असल्याचे आढळले. त्यांनी या टाइल्स उखडायला सुरुवात केल्यावर एक उग्र वास पसरू लागला. खाली एक बनियन सापडली आणि पुढे खोदकाम करत असताना विजय चव्हाण यांचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी सांगितले की, विजयची २८ वर्षांची पत्नी कोमल चव्हाण सध्या बेपत्ता असून तिच्यासोबत शेजारी राहणारा मोनू नावाचा व्यक्तीही गायब आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांनी मिळून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेह कुठे दूर फेकून देण्याऐवजी त्यांनी तो घरातच पुरला. त्यावर नव्या टाइल्स लावून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला.
शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, कोमलने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की बाथरूमचा ड्रेनेज ब्लॉक झाले आहे. तिने कामगार बोलावले आहेत. कोमलला तिच्या मृत पतीपासून आठ वर्षांचा मुलगा आहे.
ही घटना देशात अलीकडे घडलेल्या अनेक विवाहबाह्य संबंधांशी संबंधित हत्या प्रकरणांपैकी एक आहे ज्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला मेघालयमध्ये सोनम रघुवंशी या महिलेने आपला पती राजा याचा हनिमूनदरम्यान खून केल्याचे उघड झाले होते. चौकशीतून समोर आले की सोनमने राजा याच्याशी बळजबरी लग्न केलं होतं. ती दुसऱ्याच एका पुरुषावर प्रेम करत होती.
तसेच उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभ राजपूत याला ठार करून तुकडे करून सिमेंटच्या ड्रममध्ये भरल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी व तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केली होती.
पालघर प्रकरणात, कोमल व मोनू हे दोघे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या मते हे दोघेही या प्रकरणातील मुख्य संशयित आहेत.


