Mumbai Pune Expressway : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेला ज्वलनशील गॅस टँकर अखेर 32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हटवण्यात आला. 

Mumbai Pune Expressway : मुंबई–पुणे महामार्गावर मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झालेली वाहतूक अखेर पूर्वपदावर येऊ लागली आहे. आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला गॅस टँकर तब्बल 32 तासांच्या काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशननंतर रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. या कारवाईनंतर पुणे–मुंबई आणि मुंबई–पुणे दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

32 तासांचे संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन

टँकरमध्ये काही प्रमाणात ज्वलनशील गॅस शिल्लक असण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत सावधगिरीने पार पाडण्यात आले. फायर ब्रिगेडकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता, तर तीन मोठ्या क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलण्यात आला. परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

Scroll to load tweet…

अनेक यंत्रणांचा समन्वय; मोठा धोका टळला

या रेस्क्यू मोहिमेत महामार्ग पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन दल, ओएनजीसीचे तज्ज्ञ पथक, सीआयएसएफचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी समन्वयाने काम केले. सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Scroll to load tweet…

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला होता. यामुळे महामार्गावर तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक प्रवासी तासनतास वाहनांत अडकून पडले होते. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Scroll to load tweet…

टोल वसुलीवर प्रवाशांचा रोष

वाहतूक पूर्णतः ठप्प असतानाही टोल वसुली सुरूच राहिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. या संपूर्ण प्रकारात प्रशासनाने प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. मात्र आता टँकर हटवण्यात यश आल्याने वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहे.

Scroll to load tweet…