Anil Parab on Aditi Tatkare: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या राजकीय शर्यतीत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत लिंबू-मिरची दाखवत मंत्री भरत गोगावले यांच्यावर उपरोधिक टीका केली. 

मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी सुरु असलेल्या राजकीय शर्यतीने आता अघोरी वळण घेतलं आहे. या वादात भर टाकत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत लिंबू-मिरची दाखवत थेट मंत्री भरत गोगावले यांच्यावर उपरोधिक टीका केली. “माझ्या बहिणीचं रक्षण करावं म्हणून मी लिंबू मिरची आणली आहे,” असं म्हणत परब यांनी सभागृहात हास्याची लाट उसळवली, पण त्यामागचा संकेत गंभीर होता.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी चुरस सुरू

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावर सध्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात चुरस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पद सध्या होल्डवर ठेवले असले तरी, स्थानिक राजकारणात याचे पडसाद तीव्र आहेत. माध्यमांमधून असा दावा करण्यात आला होता की, गोगावले यांनी पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी काही अघोरी पूजा केली, रेड्यांचे आणि बैलांचे बळी दिले गेले, जादूटोणा करणाऱ्यांना घरी बोलावले, अशा व्हिडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर प्रसारित झाल्या.

“आदिती तटकरे यांचं रक्षण करायला आलो आहे” – अनिल परब

विधान परिषदेतील नगराध्यक्ष विधेयकावर चर्चा करताना, अनिल परब यांनी विषयाला वेगळं वळण दिलं. ते म्हणाले, "सरकार लाडक्या बहिणींना १५०० रुपये देते ही चांगली गोष्ट आहे. पण मी भावाच्या नात्याने आदितीताईसाठी काहीतरी करावं, असं वाटलं. रायगडमध्ये पालकमंत्रिपदासाठी अघोरी प्रकार सुरू आहेत. मी अंधश्रद्धा मानत नाही, पण बहिणीच्या रक्षणासाठी लिंबू-मिरची देतो!" सभागृहात त्यांची ही फटकेबाजी पाहून अनेक सदस्य हसले, तर काहींनी त्यांना अंधश्रद्धा पसरवू नका, असंही सुनावलं. त्यावर परब म्हणाले, "माझा हेतू अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही, पण भावाने बहिणीच्या रक्षणासाठी काहीतरी देणं हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणून मी लिंबू-मिरची आणली आहे."

नाव न घेता निशाणा

विशेष बाब म्हणजे, परब यांनी भरत गोगावले यांचं एकदाही थेट नाव घेतलं नाही, पण संदर्भ, शब्दरचना आणि शैलीवरून त्यांच्या टीकेचा बाण कुठे लागतोय, हे स्पष्ट होतं.

राजकारण, अंधश्रद्धा, सत्तास्पर्धा आणि उपरोध यांची सरमिसळ झालेली ही घटना विधानपरिषदेत चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरली आहे. एका पालकमंत्रिपदासाठी इतक्या टोकाचं राजकारण आणि चर्चा होणं, हे महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर वेगळं चित्र उभं करतं आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.