Babanrao Lonikar : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयीच्या कथित विधानावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्वतःला शेतकरी असल्याचे सांगत, शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसोबत राहण्याची प्रतिज्ञा केली आहे.
मुंबई : राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कालपासून जोरदार चर्चा सुरु आहे, आणि त्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या कथित विधानाने वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र आज लोणीकर यांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मी शेतकऱ्यांचा विरोधी आहे हे कोणीही सिद्ध करू शकत नाही. मी स्वतः एक शेतकरी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार."
"माझ्या मृत्यूनंतर हाडंही म्हणतील, मी शेतकरी आहे!"
विधानसभेत बोलताना बबनराव लोणीकर आक्रमक झाले. त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवत म्हटलं, "माझ्या मृत्यूनंतरही माझं हाड म्हणेल की मी शेतकरी आहे." ते पुढे म्हणाले, "मी ४० वर्ष राजकारणात आहे. मी कधीही शेतकऱ्यांविरोधात एक शब्द बोललो नाही. पण माझ्यावर खोटे आरोप लावून राजकारण केले जात आहे."
"शेतकऱ्यांची माफी, हजार वेळा घेतली तरी कमीच!"
आपल्या वक्तव्यामध्ये लोणीकरांनी भावनिक पातळीवर जाऊन सांगितले की, "मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागायला तयार आहे. कारण ते आमचे अन्नदाते आहेत. पण काही जणांनी जे राजकारण केलंय, त्यांच्या मी माफी मागणार नाही."
विरोधकांचा जोरदार हल्ला, पण लोणीकर ठाम
लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना स्पष्ट केला की, "शेतकरी विरोधी बोलणं माझ्या स्वभावातच नाही. मी त्यांच्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरलेलो आहे." मात्र विरोधकांनी त्यांच्या विधानावरुन जोरदार टीका करत त्यांच्यावर आरोप ठेवले की ते शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे आहेत. बबनराव लोणीकर यांच्या विधानामुळे विधानसभेत निर्माण झालेला वाद अधिक तीव्र झाला असला, तरी त्यांनी आज स्पष्ट भूमिका घेत शेतकऱ्यांविषयी आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली. "माझं आयुष्य शेतकऱ्यांसाठीच वाहिलं आहे," असे ठामपणे सांगत त्यांनी राजकीय टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं.
शेतकऱ्यांविषयी नेमकं काय म्हणाले होते लोणीकर
लोकांना उद्देशून बोलताना लोणीकर यांनी म्हटलं होतं. "शेतकऱ्यांना पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. महिलांना लाडकी बहीण योजनेतील रक्कम मोदींमुळे मिळत आहे. तुझ्या मायचा पगार आणि बापाची पेन्शन आम्हीच दिली आहे." या शेतकऱ्यांविषयी अतिशय आक्षेपार्ह आणि मुजोर शब्दांत वादग्रस्त विधान केल्याने भाजपचे आमदार बबनराव लोणीकर अडचणीत आले होते.


