पुण्यामध्ये दोन देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एका घटनेत मायलेकीला वेशाव्यवसायात ढकलणाऱ्या स्पा सेंटरच्या मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत विमानतळ परिसरातून 16 मुलींची सुटका करण्यात आली आहे.

पुणे : शहरातील लोहगाव येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पाच महिलांची सुटका केली असून, त्यात दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी एका 15 वर्षीय मुलीची आईदेखील याच वेश्याव्यवसायात सामील असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या 28 वर्षीय महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

मॅनेजर महिलेकडून गरीब मायलेकीचा छळ

अटक झालेल्या आरोपीचे नाव किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय 28, रा. खराडी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्पा सेंटरची मालक आणि व्यवस्थापक असून, तिने गरिबीचा फायदा घेत तीन महिलांना व दोन अल्पवयीन मुलींना मसाज कामाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलले. पोटाची खळगी भरण्यासाठी व अधिक पैशांचे आमिष दाखवत या महिला व मुलींना बळजबरीने या अनैतिक कामात ओढले गेले होते.

पोलिसांची कारवाई आणि कायदेशीर गुन्हा

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (PITA) विभागाने ही कारवाई केली असून, विमानतळ पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा, पीटा कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, “आम्हाला स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता, पाच पीडित महिला आढळून आल्या. आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.”

विमानतळ पोलिसांचे दुर्लक्ष?

हा स्पा सेंटर विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांना या व्यवसायाबाबत माहिती नव्हती का, की त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलं, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. समाजाच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाचीही जबाबदारी ठरते.

बाणेर आणि विमानतळ परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दुसऱ्या घटनेत, पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेर आणि विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. दोन्ही ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी एकूण १८ तरुणींना या रॅकेटमधून मुक्त केले असून त्यापैकी १० मुली परदेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली चालत होता अनैतिक व्यवसाय

पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परिमंडळ ४ अंतर्गत बाणेर आणि विमानतळ परिसरातील मसाज आणि स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. तपासात स्पष्ट झाले की, या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून अश्लील कृत्य करून घेतले जात होते. विशेष म्हणजे, परदेशी मुलींनाही या व्यवसायात गुंतवण्यात आले होते.

१६ मुलींची सुटका, जागा मालकावरही कारवाई

विमानतळ परिसरात झालेल्या कारवाईत १६ मुलींची सुटका करण्यात आली असून त्यापैकी १० परदेशी आणि ६ भारतीय आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी केवळ स्पा सेंटर चालवणाऱ्या मालक व मॅनेजरलाच नव्हे तर, जागा मालकावरदेखील कारवाई केली आहे. यांच्यावर भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक FIR नुसार, संबंधित स्पा सेंटरमध्ये गरजूंना नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. विशेष म्हणजे, परदेशातून आलेल्या मुलींना बेकायदेशीर पद्धतीने या व्यवसायात गुंतवण्यात आले होते. पोलिसांनी ही कारवाई अत्यंत गुप्ततेने आणि अचूक नियोजनात केली.