Solapur Crime : सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने आत्महत्या केली. पतीने पत्नीचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेतला. या घटनेचे कारण अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका नवविवाहित जोडप्याने आपले जीवन संपवले आहे. पतीने पत्नीचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली असून, यामुळे संपूर्ण सोलापूर हादरले आहे.

काय घडलं नेमकं?

उळे गावातील गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) या दोघांचा दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. आषाढी एकादशीनिमित्त त्यांचे कुटुंबीय कीर्तनासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबियांना गोपाळ आणि गायत्री हे दोघेही मृतावस्थेत आढळून आले.

प्राथमिक माहितीनुसार, पती गोपाळने त्याची पत्नी गायत्री हिचा चार्जिंगच्या वायरने गळा आवळत खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली. गोपाळने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेने सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी एक धक्कादायक घटना, पैशांच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!

सोलापूर जिल्ह्यातून आणखी एक गंभीर गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावात पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

रावण सोपान खुरंगुळे (70) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगुळे याने वडिलांना काठी आणि पोतराजाच्या चाबकाने बेदम मारहाण करून ठार केले. या मारहाणीत वडिलांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

या घटनेमागे बैल विक्रीनंतर मिळालेल्या पैशांवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. वडिलांनी बैल विकले होते, परंतु त्यातून मिळालेले पैसे मुलाला दिले नाहीत. याच रागातून मुलाने हे क्रूर कृत्य केले. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अनिल खुरंगुळे याला बार्शी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.