लक्ष्मण हाके यांनी ओबीसी संघर्ष यात्रेची घोषणा केली असून, त्यांनी शरद पवारांसह अनेक नेत्यांवर टीका केली आहे. भोगलवाडीतील त्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली. हाके यांच्या मते, ओबीसींच्या अधिकारांसाठी हा संघर्ष आवश्यक आहे.
मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापले असताना ओबीसी समाजानेही आता जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजाच्या दोन महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरनंतर ओबीसी नेत्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये राज्यभरातील ओबीसी नेत्यांची मोठी बैठक होणार आहे. तर दुसरीकडे, ९ सप्टेंबर रोजी "इतर मागास व बहुजन कल्याण" मंत्री अतुल सावे यांच्या विभागातर्फे ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांवर शासनस्तरावर चर्चा होणार आहे.
ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा
मराठा आरक्षणावर जीआर निघाल्यानंतर विदर्भासह अनेक जिल्ह्यांतील ओबीसी नेत्यांनी याचा तीव्र विरोध केला होता. नागपुरात विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ८ सप्टेंबरची मुंबई बैठक निश्चित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारच्या जीआर संदर्भात ठोस भूमिका घेण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने याआधीच "जीआरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येत नाही" असे स्पष्ट केले आहे. मात्र, ओबीसी नेत्यांमध्ये अद्यापही अस्वस्थता दिसून येत आहे.
लक्ष्मण हाकेंची संघर्षयात्रेची घोषणा
ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आता राज्यव्यापी संघर्षयात्रा काढण्याचे संकेत लक्ष्मण हाके यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी दोन दिवसांत ओबीसी संघर्ष यात्रा जाहीर करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आणि "पवार साहेब, आमच्या नादाला लागू नका" असा इशाराही दिला. हाके म्हणाले, “मुंडे साहेब असते तर आज महाराष्ट्र या परिस्थितीत अडकला नसता. आमचा विकास अपूर्ण आहे, तो पूर्ण करण्यासाठीच संघर्ष यात्रा काढावी लागेल.”
गर्दी आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भोगलवाडीत झालेल्या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. सभेला आलेल्या युवकांनी पाच किलोमीटर पायी चालत उपस्थिती लावली. यावर हाके म्हणाले, “महाराष्ट्र पाहत आहे की भोगलवाडीत किती गर्दी झाली आहे. हीच आमच्या संघर्षाची खरी ताकद आहे.” त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारंवार उल्लेख करत, “मुंडेंनी आम्हाला स्वाभिमान दिला. आता त्याच स्वाभिमानासाठी ओबीसी समाज एकत्र येणार आहे,” असे ठामपणे सांगितले.
नेत्यांवर हाके यांची टीका
लक्ष्मण हाकेंनी आपल्या भाषणात अनेक नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे कौतुक करताना, "ते कधीही वेडवाकडं बोलले नाहीत," असे म्हटले. मात्र छगन भुजबळ, सुंदरराव सोळंके आणि शरद पवार यांच्यावर त्यांनी तीव्र टीका केली. सोळंकेना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हाके यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “आम्ही तुमच्याकडे पाहून मतदान दिलं, पंडित किंवा सोळंकेकडे नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघर्ष यात्रेतून उभारला जाणार दबाव
हाके यांच्या संघर्ष यात्रेच्या घोषणेने ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या सभेतून हे स्पष्ट झाले की, आता ओबीसी समाज आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरण्यास सज्ज आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढताना ओबीसींच्या भावना दुखावल्या, असा सूर ओबीसी नेत्यांच्या चर्चेतून उमटत आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसी संघर्ष यात्रा महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.


