सार
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या एसआयटीतील काही अधिकाऱ्यांचे फोटो खंडणी प्रकरणातील आरोपीसोबत आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. याप्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच हत्येप्रकरणी चौकशी करणारी एसआयटी बरखास्त करण्यात आली आहे. नवीन एसआयटीत नऊऐवजी फक्त सहा जणांचा समावेश आहे. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख म्हणून कायम राहतील.
याआधी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीतील अधिकाऱ्यांचे फोटो खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सोबत दिसून आले होते. यानंतर या एसआयटीतील अधिकाऱ्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. एसआयटीतील काही अधिकारी, सदस्य बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यानंतर एसआयटीतील काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी देखील करण्यात आली होती.
आणखी वाचा- धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे! पोलिसांच्या विनंतीनंतर पाण्याच्या टाकीवरून उतरले
नवीन एसआयटीतील सदस्य
किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, सीआयडी, छत्रपती संभाजीनगर), अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड), सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड), अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक,राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
आणखी वाचा- संतोष देशमुख हत्या प्रकरण: सर्व आरोपींवर मोक्का, पण वाल्मिक कराडवर का नाही?