शरद पवारांच्या एनसीपी गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय या पदासाठी तीन जणांची नावे दावेदार म्हणून घेतली जात आहेत. मात्र शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सत्तेपासून दूर असलेल्या पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करत नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार केला. मात्र, याच कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करा” असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली.
जयंत पाटील यांचा जवळपास सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून या काळात त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंत्री आणि नंतर विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली. मात्र, मागील काही महिन्यांपासून रोहित पवार यांच्या गटातून नवीन नेतृत्वाची मागणी वाढली आहे. शरद पवार यांनी देखील यासंदर्भात विचार केल्याचे सांगितले असून आता प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नावांची चर्चा रंगली आहे.
राजेश टोपे – मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री. कोरोना काळात त्यांच्या कामगिरीचे कौतुक झाले होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय. संघटनात्मक कौशल्य आणि अनुभव यांच्या जोरावर त्यांना संधी मिळू शकते.
शशिकांत शिंदे – पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक आणि अनुभवी नेते. सातारा, नवी मुंबई भागात त्यांचा चांगला प्रभाव आहे. पक्षाला आक्रमक स्वरूप देण्यासाठी योग्य पर्याय मानला जातो.
सुनील भुसारा – आदिवासी समाजातून आलेले माजी आमदार. साधा, जमीनवरचा नेता अशी ओळख. रोहित पवार यांच्याशी जवळीक आणि कुठलाही वाद नसलेला चेहरा असल्याने त्यांचीही शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार यांच्या निर्णयाकडे संपूर्ण पक्षाचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे. नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून पक्षात नवचैतन्य येईल का, हे लवकरच स्पष्ट होईल.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


