Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर टँकर पलटी झाल्याने तब्बल 32 तास वाहतूक ठप्प झाली. टँकर हटवूनही बोरघाटात वाहन बिघाडांमुळे कोंडी कायम आहे. 

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway Traffic) टँकर पलटी झाल्याने निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी अद्याप पूर्णपणे सुटलेली नाही. तब्बल 32 तास प्रवासी या कोंडीत अडकून पडले होते. टँकर हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, 24 तास उलटूनही पुणे–मुंबई दिशेने बोरघाट परिसरात पुन्हा एकदा वाहनांची रांग लागली असून काही वाहन बिघडल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

32 तासांचा वाहतूक कोंडीचा हाहाकार

पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर टँकर पलटी झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे हजारो वाहनचालक, प्रवासी, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले. अनेक तास वाहनांमध्येच अडकून राहावे लागल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

टँकर हटवूनही बोरघाटात पुन्हा कोंडी

अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, बोरघाट परिसरात काही अवजड आणि खासगी वाहने बंद पडल्याने पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत ही वाहने हटवली जात नाहीत, तोपर्यंत वाहतूक पूर्वपदावर येणार नसल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची गंभीर दखल

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एमएसआरडीसीला चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेची दखल घेत तातडीने आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

32 तास एक्स्प्रेसवे ठप्प; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग तब्बल 32 तास बंद राहिल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. “अशा घटनांनंतर नेहमी चौकशीचे आदेश दिले जातात, पण त्या चौकशांतून प्रशासन काही बोध घेतं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अपघातानंतर वाहतूक थांबवणं योग्य होतं, पण अशा परिस्थितीत रस्ता कमीत कमी वेळात मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस कृती आराखडा तयार होता का?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे.