राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील 2 अटी काढा, यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे, म्हणूनच आपलं अन्नत्याग आंदोलन सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, आज गिरीश महाजन यांच्याभेटीनंतर त्यांनी आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे, पण...

पंढरपूर : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपलं उपोषण तुर्तास मागे घेतलं आहे. पंढरपुरात हे अन्नत्याग आंदोलन सुरु होतं. शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सरकारच्या वतीने मंत्री गिरिश महाजन यांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा केली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं करुन दिलं. यानंतर तुर्तास अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

30 जून रोजी कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी 22 जून आधी मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवार, राजू शेट्टी, रविकांत तुपकर, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अजित नवले , शेकापचे जयंत पाटील हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत, ठाकरे गटाचे नेते देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रोहित पवार यांना कर्जमाफी जीआरमधील अटींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रोहित पवार यांचं संपूर्ण कुटूंब पंढरपुरात उपोषणासाठी उपस्थित आहे. रोहित पवार यांचं मागील 3 दिवसांपासून उपोषण सुरु होतं. रोहित पवार यांनी गिरिश महाजन यांच्याशी बोलताना सांगितले, 2 लहान अटी आहेत, त्या काढल्या गेल्या पाहिजे, जर त्या काढल्या गेल्या नाहीत, तर जुलैत मराठवाड्यात पुन्हा आंदोलन करु.

तर आंदोलन करण्यापूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती, अन्नत्याग म्हणजेच उपोषण करताना खूप त्रास होतो. कारण मला देखील जळगावात 11 दिवस उपोषण केल्याने काय त्रास होतो, ते माहित आहे. त्यावेळी तर माझ्याकडे कुणी पाहतही नव्हते, तेव्हाचे नेते गुलाबराव देवकर यांचं घर 500 फूट अंतरावर होतं, पण ते माझ्याकडे पाहतंही नव्हते, त्यांना वरिष्ठांनी तशा सूचना दिल्या होत्या.म्हणून आंदोलन आणि त्यातही उपोषण करण्याच्या भानगडीत पडू नये, मोदी सरकार आणि फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील आहे. अनेकवेळा नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना मोठी मदत सरकारने सढळ हाताने केलेली आहे, असं यावेळी गिरिश महाजन यांनी सांगितलं.