Monsoon Update : राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून, पुढील पाच दिवस कोकण, घाटमाथा आणि सखल भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुणे: राज्यात मान्सूनचं जोरदार आगमन झालं असून, पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि सखल भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

बंगालच्या उपसागरातून सक्रिय मान्सून

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचे वारे अधिक सक्रीय झाले आहेत. यामुळे राज्यात अनेक भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. डॉ. एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून, येथील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Scroll to load tweet…

पुढील 5 दिवस कसे राहतील?

कोकण व घाटमाथा: मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्र: हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

विदर्भ: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, यलो अलर्ट

मराठवाडा: पावसाची तीव्रता कमी, पर्जन्यछायेचा प्रभाव कायम

मराठवाड्यात पाऊस कमी का पडतो?

मराठवाडा हा पर्जन्यछायेत (Rain Shadow Zone) येतो. घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाने वाऱ्यातील बाष्प कमी होते, त्यामुळे मराठवाड्यात पोहोचणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रता कमी राहते आणि तिथे पावसाचा जोर कमी होतो. यावर्षीही अशीच परिस्थिती असून, बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात कमी दाबाचा प्रभाव अधिक असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

जून महिन्यात पावसाचं चित्र

देशपातळीवर जुलैपूर्वीच 109% पावसाची नोंद झाली असली तरी महाराष्ट्रात ही स्थिती विभागनिहाय वेगळी आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण: सरासरीपेक्षा अधिक पाऊस

मराठवाडा आणि विदर्भ: अपेक्षेपेक्षा कमी पाऊस

पुणे जिल्ह्यातील स्थिती

घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहर आणि आसपासचा सपाट भागात मात्र पावसाची तीव्रता कमी असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

प्रशासनाचं आवाहन

राज्यातील नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आणि गरज असल्यास घरातच थांबण्याचे आवाहन केलं आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील नागरिकांनी संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी.