मेळघाटातील धारणी तालुक्यात राणीगाव-शिवाझीरी घाटात प्रवाशांनी भरलेली पिकअप ५० फूट खोल दरीत कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले.
मेळघाटातील धारणी तालुक्यातून रविवारी सायंकाळी एक भीषण अपघाताची घटना समोर आली. राणीगाव ते शिवाझीरी दरम्यान असलेल्या घाटात प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धारणी तालुक्यातील कंजोली गावातील १५ ते २० नागरिक रविवारी मध्य प्रदेशातील देडतलई येथील आठवडी बाजारासाठी गेले होते. बाजार आटोपून ते राणीगाव, सुसर्दा, शिवाझीरी आणि नारदु मार्गे पिकअप वाहनाने परत येत होते. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास राणीगाव-शिवाझीरी घाटातील ‘घोडादेव बाबा’ मंदिराजवळील धामणनाला परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पिकअप अनियंत्रित झाली आणि थेट ५० फूट खोल दरीत कोसळली. दरीची खोली आणि वाहनातील प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अपघात अत्यंत भीषण ठरला.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
अपघातात कंजोली गावातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली आणि जखमींना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खड्ड्यांमुळेच अपघात?
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. राणीगाव, सुसर्दा आणि शिवाझीरी मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे रस्ते दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुढील तपास सुरू
घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण मेळघाट परिसरात शोककळा पसरली आहे.


