Sachin Ahir Letter to Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षप्रवेशानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

Sachin Ahir Letter to Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उबाठाला रामराम ठोकला आहे. यानंतर सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

उपसभापतीपदासाठी सचिन अहिरांचा अर्ज

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आदित्य ठाकरेंचे विश्वासू नेते अखेर शिंदे सेनेत

कालपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रत्येक राजकीय कार्यक्रमात दिसणारे सचिन अहिर अचानक शिंदे सेनेत दाखल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सकाळपर्यंत उपसभापतीपदासाठी शिंदे सेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरू होती. मात्र अचानक सचिन अहिर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ठाकरे गटातील महत्त्वाच्या चेहऱ्याला आपल्या गोटात आणण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.

'पक्षांतर नाही, पक्षप्रवेश'

सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, “सचिन अहिर यांनी पक्षांतर केलेले नाही, तर त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे,”असे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंना पत्र

शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उबाठा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ठाकरे यांचे आभार मानले. काही अपरिहार्य कारणांमुळे आपण पक्ष आणि सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. तसेच पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या.

काय म्हणाले पत्रात? 

माननीय श्री. उध्दवजी ठाकरे साहेब,
महोदय, शिवसेना पक्ष प्रमुख
सस्नेह जय महाराष्ट्र...

आदरणीय महोदय,

सविनय विनंती करतो की, मी सचिन अहिर, सरचिटणीस भारतीय कामगार सेनेच्या तसेच अध्यक्ष बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेना या पदांवर कार्यरत आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहे. तथापि, मी काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदांचा राजीनामा देत आहे. तरी महोदय आपण माझा हा राजीनामा मंजूर करण्यात यावा, तसचे आपण दाखविलेला विश्वास व प्रेम कायम असेच राहवे, ही नम्र विनंती. पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा सदैव राहतील. धन्यवाद.

आपला,

सचिन अहिर

ठाकरे गटासाठी वाढती चिंता?

गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील नेत्यांच्या गळतीची चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांच्या एक्झिटने त्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. खासदारांनंतर आता विधान परिषदेतील महत्त्वाच्या चेहऱ्यानेही शिंदे सेनेची वाट धरल्याने आगामी काळात ठाकरे गटातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.