सार
मराठा आंदोलकांनी राज्य परिवहानाची बस पेटवल्याचा प्रकार जालन्यात घडला आहे. यामुळे जालन्यात बस सेवा बंद करण्यात आली आहे.
Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. मराठा आंदोलकांनी जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यात तीर्थपुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहानाची बस जाळली आहे. खरंतर, मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हटले की, पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील बस सेवा बंद राहणार आहेत. मराठा आंदोलकांनी बस जाळल्यानंतर जालन्यातील पोलीस अधीक्षकांनी हे पाऊल उचलले आहे.
अंबड तालुक्यात संचारबंदी
मराठा आंदोलकांनी बस जाळल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अंबड डेपो व्यवस्थापकांद्वारे एका स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. अशातच कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत येणार
जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश देत म्हटले की, जरांगे यांनी रविवारी (25 फेब्रुवारी) घोषणा करत मुंबईत जाणार असून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. यामुळे आंदोलकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पाहता धुळे-मुंबई महामार्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच कायदा आणि सुवव्यस्था कायम राहण्यासाठी सोमवारी (26 फेब्रुवारी) रात्रीपासूनच पुढील आदेशापर्यंत अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या गोष्टी करण्यास असणार परवानगी
जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले की, शासकीय कार्यालये, शाळा, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक, दूध वितरण, मीडिया आणि रुग्णालयांना आपल्या कामकाजासाठी परवानगी असणार आहे. दुसऱ्या बाजूला रविवारी रात्री मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून भांबेरी गावात दाखल झाले. दरम्यान, सोमवारी सकाळी जरांगे आंतरवाली सराटी येथे परतले असून वैद्यकिय उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातून 19 वर्षीय तरुणाला अटक