- Home
- Maharashtra
- Manoj Jarange Patil : आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची लाट उसळली, जरांगे पाटील कधी पोहोचणार? अपडेट हाती!
Manoj Jarange Patil : आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची लाट उसळली, जरांगे पाटील कधी पोहोचणार? अपडेट हाती!
Manoj Jarange Patil : हजारो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्याहून मुंबईकडे कूच करत आहेत. 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठीचा निर्णायक टप्पा आता सुरु झाला असून, हजारो आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 27 ऑगस्ट रोजी सकाळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून या ऐतिहासिक मोर्चाची सुरुवात झाली. 29 ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषण आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असून, त्यापूर्वीच आंदोलकांची मोठी गर्दी मुंबईत पोहचण्यास सुरुवात झाली आहे.
मोर्चाचा निर्धार, आरक्षणाचा निकाल मुंबईतच!
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आता निर्णायक लढा मुंबईतच लढायचा आहे." त्यांनी संपूर्ण समाजाला या लढ्याला साथ देण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चाचा प्रवास आणि मार्ग बदल
असुरक्षित वळणांमुळे माळशेज घाटातील मार्ग बदलण्यात आला असून, मोर्चा आता पैठण, अहिल्या नगर, कल्याण फाटा, नारायणगाव, शिवनेरी किल्ला, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल मार्गे मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. मोर्चाच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक मराठा बांधवांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.
आज रात्री मुंबईत दाखल होण्याची शक्यता
मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या ते जुन्नरमार्गे प्रवास करत असून, ठिकठिकाणी होत असलेल्या स्वागतामुळे त्यांच्या वेळेत थोडा विलंब होऊ शकतो. रायगड व नवी मुंबई येथे अल्प विश्रांती आणि भोजनानंतर ते आझाद मैदानात पोहोचतील, अशी शक्यता आहे.
आझाद मैदानात जय्यत तयारी, आंदोलनासाठी पूर्ण सज्जता
मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठीची तयारी जोमात सुरू आहे. मंडप उभारण्यात आले असून, वाहन पार्किंगची व्यवस्था, अन्न व निवासाची सोयही करण्यात आली आहे. राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत.
29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात
पोलीस प्रशासनाने दिलेल्या अटींनुसार आंदोलन ठरलेल्या वेळेत सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात करतील, अशी शक्यता आहे.

